प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील बीड शेड येथे आज गोकुळ दूध संघामार्फत म्हैस दूध वाढ उत्पादक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये गोकुळ दूध संघ उत्पादकांच्या पाठीशी नेहमीच राहील अशी ग्वाही चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. या मेळाव्यामध्ये करवीर तालुक्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, कै. आनंदराव चुयेकर यांच्या विचारातून दूध संघ निर्माण झाला. मुंबई मार्केट तयार करून गोकुळ संघ नावारूपास आला. दूध उत्पादकांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करावे. त्यासाठी गोकुळ दूध संघ व के डी सी सी बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत आपण नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब खाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये अडीच वर्षानंतर परराज्यातून येणारे दूध थांबवून राज्यातील दूध उत्पादकांनी दूध वाढ करून फायदा घ्यावा. यासाठी सर्व योजना गोठ्यापर्यंत गोकुळच्या मार्फत पोहोचवू असे सांगितले. तर गोकुळ दुध संघ व अण्णासाहेब पाटील आणि के डी सी सी बँक यांच्या कडून मिळणाऱ्या कर्जाची व परतफेड कशा पद्धतीने करायची हे साध्या व सोप्या भाषेत अजित नरके यांनी सांगितले.