प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गोकुळ निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या मर्यादेत सुरु असलेल्या चर्चेत भाजपनेही उडी घेतली आहे. गोकुळमध्ये भाजपला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांदादा पाटील यांनी मंगळवारी मांडली. यासंदर्भात सत्ताधारी आघाडीचे नेते महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी बोलू, या चर्चेचे सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांना दिले आहेत. असे चंद्रकांतदादा यांनी स्पष्ट केले.
गोकुळची निवडणूक जसजशी जवळ येईल तशी राजकीय समिकरणे नव्याने समोर येत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील यांच्यात चर्चा सुरु आहे. या घडामोडी सुरु असताना भाजपची नेमकी काय भूमिका आहे. याविषयी चंद्रकांतदादा पाटील यांना विचारले असतान त्यांनी वरील भूमिका मांडली.
ते म्हणाले, गतवेळी आम्ही सहकारी बिद्री, भोगावती, जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो. जिल्हा बँकेत अनिल पाटील यांना संधी मिळाली. त्यामुळे यंदा होत असलेल्या गोकुळ, जिल्हा बँकेसह सर्व प्रमुख सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाजप ताकदीने उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळबाबत विचारले असता त्यांनी भाजपला वाट मिळाला पाहिजे. अशी मागणी केली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पक्षाचे नेटवर्क आहे.
चांगले ठराव आमच्याकडे आहेत. याबाबत जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेमकी कुणाबरोबर चर्चा करणार यावर ते म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत दोन ध्रुव ठरलेले आहेत. आणखी नव्याने काय करवे असे वाटत नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ शकत नाही. माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत चर्चेची तयारी केली आहे. योग्य दिशेने चर्चा होवून भाजपला गोकुळमध्ये चांगली संधी मिळेल, असे शेवटी सांगितले.