प्रवेश नाक्यांवरील बंदोबस्तात वाढ, मिरवणूक काढल्यास थेट गुन्हा
प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळ मतमोजणी मंगळवार दि. चार मे राजी रमणमळा बहुउद्देशीय हॉल येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या सर्व प्रवेश मार्गावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी ग्रामीण भागातून शहरात प्रवेशास बंदी केली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. तसेच मिरवणूक काढल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेशही सर्व विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणूकीमध्ये चुरशीने 99.78 टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मतदान आणि मतमोजणी पार पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गोकुळची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून रमणमाळ येथील बहुउद्देशीय हॉल येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्रवेश करणाऱया 9 नाक्यांवरील बंदोबस्तामध्ये सोमवार रात्री पासूनच वाढ करण्यात आली आहे.
वैद्यकीय, आणि अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना मंगळवारी ग्रामीण भागातून प्रवेश नाकारण्यात येणार आहे. इंट्री पॉईंटवर तपासणी करुनच नागरीकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच निकालानंतर मिरवणूकीवर बंदी घातली असून मिरवणूक काढल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.रमणमाळा मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राबाहेरही कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. 10 अधिकारी, 50 पोलीस कर्मचारी, 50 होमगार्ड यासह स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आला आहे.
आरटीपीसीआर चाचणी सक्तीची
मतमोजणीच्या ठिकाणी असणाऱया सर्व अधिकारी, कर्मचाऱयांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर मंगळवारी केवळ उमेदवारांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवल्यानंतरच प्रवेश देण्यात येणार आहे.
वाहतूक मार्गात बदल
1) महावीर कॉलेजकडून कसबा बावड्याकडे जाणारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालय – आदित्य कॉर्नर – धैर्यप्रसाद चौक – सर्किट हाउस – लाईन बाजारमार्गे मार्गस्थ होणार आहेत.
2) कसबा बावड्याकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारी वाहने भगवा चौक – लाईन बाजार सर्किट हाउस – धैर्यप्रसाद चौकातून ये – जा करतील.
3) पोलीस वाहने, अग्नीशमन दल, शासकीय वाहने, रुग्णवाहीका, निवडणूक अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी, पासधारक वाहनांना येथून जाण्यास परवानगी असणार आहे.