वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कोरोणा विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी बंद तीन मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कारखाने गेल्या 20 मार्च पासून बंद आहेत. कारखाने चांगले व सुस्थितीत आहेत. त्यांनी आपल्या परमनंट कर्मचाऱ्यांना पगार केले आहेत. पण जे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेस वर मिळेल त्या कामावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आजच्या घडीला अत्यंत वाईट परिस्थिती आहे. याचा प्रत्यय आज गोकुळ शिरगाव येथे रेशनचे धान्य वितरण करत असताना पहायला मिळत आहे. आम्हाला थोडे धान्य द्या म्हणून विनवणी करत उभारणारे बाहेरगावाहून आलेले लोक आज ग्रामपंचायत च्या दारात उभे आहेत.
गोकुळ शिरगाव चे सरपंच एम. के. पाटील व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्याकडे हात जोडून विनवणी करतानाचे दृश्ये पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी सरपंच पाटील यांनी आपल्या स्वतःच्या मानधना मधून ज्यांना आवश्यक आहे त्यांना मोफत धान्य दिले .आज याच भागात राहणारा कर्मचारी वर्ग मात्र आज रेशनचे धान्य वाटप चालू असताना आपल्यालाही रेशनचे धान्य मिळेल या आशेने ग्रामपंचायत च्या दारात उभे होते. जे लोक रेशन घेऊन जात होते त्यांच्याकडे हळव्या नजरेने पाहत होते. शिवाय परत परत ते सरपंच त्यांच्याकडे विनवणी करत आम्हालाही काही तरी द्या अशा तळमळीची मागणी ते सरपंच यांच्याकडे करत होते. पण यावेळी सरपंच ही या सगळ्यांना बघून हतबल झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळेच उद्योजकांनी तुमच्यासाठी कामाला उपयोगी आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता तुमची खूप गरज आहे. लवकरच या गरजू व कष्टाळू कर्मचारी वर्गाकडे मानवतेच्या भावनेतून मदत करण्याची आवश्यकता आहे.