सदर जागा डिफेन्स इस्टेट कार्यालयाच्या कक्षात असल्याने ना हरकत दाखला मिळण्यास अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर रोड शेजारी गोगटे चौकात असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. जागेचा दुरुपयोग होत असून अस्वच्छता निर्माण झाली असल्याने याचा विकास करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. याकरिता या जागेची पाहणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. तसेच ना हरकत दाखला मिळाला नसल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.
गोगटे चौकाचा विकास करून शेजारी असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या जागेत उद्यान करण्यात आले होते. मात्र देखभालीअभावी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी झाडे-झुडुपे वाढली असून कचराकुंडी निर्माण झाली आहे. तसेच काही परप्रांतीय कामगार या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. तसेच कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसर झाडा-झुडुपांनी व्यापला असल्याने गैरप्रकार वाढत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. तसेच उद्यानाच्या दोन्ही बाजूंनी जाहिरात फलक लावण्यात आल्याने संपूर्ण उद्यान झाकोळले आहे. याचा गैरफायदा घेऊन रात्रीच्यावेळी मद्यपींचा वावर सुरू आहे.
प्रस्ताव पाठवूनही दुर्लक्ष
सुशोभिकरण करण्यात आलेल्या उद्यानाला जंगलाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने उद्यानाच्या विकासासाठी आवश्यक खबरदारी घेतली नसल्याने ही अवस्था झाली असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. जवळच असलेल्या चौकाचे सुशोभिकरण आणि रेल्वेस्थानकाचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या उद्यानाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याची दखल घेऊन उद्यानाचा विकास करण्याचा प्रस्ताव आमदार ऍड. अनिल बेनके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत मांडला होता. या ठिकाणी असलेली झाडे-झुडुपे हटवून उद्यानाचे सुशोभिकरण करून नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना बैठकीत केली होती. त्यामुळे या जागेची पाहणी कॅन्टोन्मेंट बोर्डचे तत्कालिन अध्यक्ष ब्रिगेडिअर गोविंद कलवाड, कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा आदींसह अधिकाऱयांनी केली होती.
उद्यानाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची मागणी
या उद्यानाचा विकास करण्यासाठी लष्कराकडे असलेले निकामी रनगाडे देण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले होते. पण या प्रस्तावावर पुढे कोणतीच चर्चा झाली नाही. सदर जागेच्या पाहणीनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. तसेच सदर जागा डिफेन्स इस्टेट कार्यालयाच्या कक्षात येते. त्यामुळे ना हरकत दाखला अद्याप उपलब्ध झाला नाही. परिणामी उद्यानाचा विकास बारगळला आहे. सध्या या उद्यानाची परिस्थिती जैसे थे असून, याचा दुरुपयोग वाढला आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने उद्यानाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.