वाहतूक ठप्प, त्वरित दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवरही पाणी आले आहे. गोजगा-उचगाव संपर्क रस्त्यावरील गोजगा गावच्याशेजारी असलेल्या नाल्याजवळील रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान वाहून गेलेल्या रस्त्यावरून कसरत करत वाहनांची ये-जा सुरू आहे. संबंधितांनी तातडीने याकडे लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
गोजगा-उचगाव या दोन किलो मीटरच्या संपर्क रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र गावाशेजारी असलेल्या नाल्याजवळ पूलवजा बंधारा बांधण्याऐवजी केवळ पाईप घालण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे. जोरदार पावसामुळे शिवारातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला आहे. पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने दर्जाबाबत नागरिकांतून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता गेला वाहून
दोन महिन्यांपूर्वी गोजगा-उचगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र गावाशेजारी असलेल्या नाल्याजवळ पूलवजा बंधारा बांधण्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ता वाहून गेला आहे. दरम्यान नागरिकांनी पूलवजा बंधारा बांधावा, अशी मागणी केली होती. मात्र याकडे कोनाडोळा करण्यात आला होता. हा संपर्क रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.