मुंबई/प्रतिनिधी
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Indian actor) यांनी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या (mahatma gandhi jayanti) निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर (Nathuram Godse) चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. महेश मांजरेकरांच्या घोषणेनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad minister) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘गोडसे’ (godse movie) या चित्रपटाच्या घोषणेनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. महेश मांजरेकर आहे तरी कोण? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं काय योगदान आहे? केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी महेश मांजरेकर ही नाटकं करत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर इन्स्टाग्रामला सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाडांनी केलेल्या टीकेला महेश मांजरेकर यांच्यावतीने कोण प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात ‘गोडसे’ चित्रपटावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनीही महेश मांजरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. महेश मांजरेकरांच्या आगामी ‘गोडसे’ चित्रपटासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. अशा चित्रपटांमुळे महात्मा गांधींच्या प्रतिमेला जराही धक्का लागणार नाही. महेश मांजरेकर कलम 19 ( 2 ) नुसार वाजवी बंधनासह नथुरामाचे उदात्तीकरण न करता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आब राखून ‘गोडसे’ चित्रपटाची निर्मिती करणार असतील तर वकील म्हणून मी त्यांच्यासोबत राहील, असे असीम सरोदे यांनी म्हटले.