प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या विशेष सभा प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सर्व विभागाचे खातेप्रमुखांच्या उपस्थितीत 59पैकी 57 विषयांना चर्चेंती मंजूरी देण्यात आली. दरम्यान, गोडोली येथील सिटी सर्व्हे नंबर 231 या इमारतीस जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन असे नामकरण करण्याच्या ठरावास मंजूरी देण्यात आले. दरम्यान, रिमांड होमध्ये बोअरवेल खोदण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली. तसेच सदरबाजार येथील पालिका कर्मचाऱयांच्या चाळीची सुधारणा करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली. दरम्यान, 21 नंबरचा घनकचरा अंतर्गत कंपोष्टिंग शेड बांधण्याचा सर्वात कमी दर व 27 नंबरचा पोवईनाक्यावरील बांधकाम विभागाच्या जुन्या जागेत स्वच्छतालयाचा विषय नामंजूर करण्यात आले आहेत.
पालिकेवर प्रशासक असून त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच पालिकेची सभा पार पडली. सायंकाळी उशीरा स्थायी समितीच्या सभागृहात ही सभा घेण्यात आली. त्यामध्ये लक्ष्मी टेकडी येथील पालिका कर्मचाऱयांची चाळ दुरुस्ती करण्यासाठी 8 लाख 29 हजार 837 रुपयांच्या कामांस मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱयांची चाळ आता चांगली होणार आहे. सैनिक स्कूलच्या वस्तीगृहालगत असलेल्या रस्त्यालगतचे गटरचे काम करण्यात येणार आहे. शहरातील दि.1 जुलै 2019 च्या शासन परिपत्रकानुसार पालिका हद्दीतील सर्व मिळकतींना उपयोगकर्ता शुल्क आकारण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. पालिकेच्या हद्दीत पालिकेच्या मालकीच्या जागा विद्युत पोल, गॅन्ट्रीज ठिकाणी जाहीरात बोर्ड उभारुन जाहीरात प्रसिद्ध करण्याकरता जाहीरात एजन्सीकडून निविदा मागण्याचा विषय घेण्यात आला. सफाई कामगार या मंजूर रिक्त पदावर लाड पागे शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्ती करण्यास मान्यता मिळण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली आदी विषयावर चर्चा करुन मंजूरी देण्यात आली.