गोवा मराठी अकादमीतर्फे 13 फेब्रुवारीला प्रकाशन
प्रतिनिधी / पणजी
थोर गोमंतकीय कलासमीक्षक, चित्रकार, नाटककार व साहित्यिक कै. गोपालकृष्ण भोबे यांच्या यंदाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने परेश वासुदेव प्रभू यांनी लिहिलेला ‘गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य’ हा चारशेहून अधिक पानांचा ग्रंथ गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीतर्फे येत्या दि. 13 फेब्रुवारी रोजी कै. भोबे यांच्या पुण्यतिथीदिनी ‘गुगल मीट’ वर ऑनलाईन प्रकाशित होणार आहे.
कै. गोपालकृष्ण भोबे हे बार्देश तालुक्यातील नेरूलचे. 6 ऑगस्ट 1920 रोजी नेरूलला जन्मलेले भोबे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मुंबईला गेले. तेथेच त्यांची संगीतसमीक्षक, चित्रकार, साहित्यिक म्हणून कारकीर्द बहरली. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी आपले ‘धन्य ते गायनी कळा’ हे संगीतसम्राट तानसेनाच्या जीवनावरचे नाटक गोव्यात जांबावली येथील आपल्या कुलदेव श्री दामोदराला अर्पण करण्यासाठी आले असता दि. 13 फेब्रुवारी 1968 रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व धि गोवा हिंदू असेसिएशनचे अध्वर्यू श्री. रामकृष्ण नायक यांच्या हस्ते स्नेहमंदिर, बांदिवडे येथून प्रकाशित होणार असून प्रमुख वक्ते म्हणून मुंबईहून मधु गोश कर्णिक व म्हापशाहून प्राचार्य गोपाळराव मयेकर सहभागी होणार आहेत. कै. गोपालकृष्ण भोबे यांच्या एकूलत्या एक कन्या. सौ. विद्या पै बीर पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत असतील.
13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वा. कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून गुगल मीटरवर azs dnwy ngp हा सांकेतिक कोड घालून कोणालाही या कार्यक्रमास ऑनलाइंन उपस्थिती लावता येईल. कै. गोपालकृष्ण भोबे यांच्या जन्मशताब्दी सोहळय़ाला गोमंतकीय रसिकांनी व कै. भोबे यांच्या चाहत्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन गोवा मराठी अकादमीने केले आहे.