प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या गोमंत विद्या निकेतनच्या कला विभागातर्फे गेली 35 वर्षे कै. वसंत गुडे स्मृती अखिल गोवा मराठी नाटय़ स्पर्धा भरविण्यात येत आहे. यंदा या नाटय़ महोत्सवाची सुरुवात 26 ते 28 मार्च पर्यंत गोमंत विद्या निकेतनमध्ये सायं. 7 पासून सुरुवात होईल अशी माहिती आनंद मासूर यांनी दिली.
मडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाटय़ महोत्सवाची माहिती देण्यात आली. यावेळी गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर, नितीश नायक व सलील कारे उपस्थित होते.
या महोत्सवात शुक्रवार दि. 26 मार्च रोजी ‘अंधायुग’ हे महाभारतातील युद्धोत्तर काळावर भाष्य करणारे नाटक रसरंग, उगवे ही संस्था सादर करेल. 27 मार्च रोजी हंस संगीत नाटय़ मंडळ, फोंडा ‘भवाल’ हे ऐतिहासीक राजकीय नाटय़ सादर करणार आहे. तर रविवारी 28 मार्च रोजी अपरांत माची, पणजी ‘लग्नफेरे’ हे सामाजिक नाटक सादर करणार आहे असे मासूर म्हणाले.
यंदाच्या कोरोना महामारीच्या काळात नाटके निवडून स्पर्धा भरवणे संस्थेस अशक्य होते. तेव्हा गोव्यातील हौशी रंगभुमीवरील सर्व कलाकृती नाहीत तर निदान काही प्रतिनिधीक कलाकृती रसिकांपर्यंत पोहचविण्यात याव्या यासाठी स्पर्धेत तीन नाटकांचा महोत्सव करण्याचे संस्थेतर्फे ठरविण्यात आले. सरकारी बंधनाप्रमाणे सभागृहातील फक्त 50 टक्के जागाच भरण्यात येणार असल्याचे मासूर यांनी यावेळी स्पष्ट केले.