राज्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात शनिवारी 700 कर्मचाऱयांना लस
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोविड लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. सध्या 7 विविध ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असून यावेळी सुमारे 700 कर्मचाऱयांना लस देण्यात आली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमॅको) या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी गोमॅकोतील आरोग्य कर्मचारी रंगनाथ भोज्जी यांना पहिली लस देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लसीकरण कार्यक्रमादरम्यान दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हिताचा विचार करुन लवकरात लवकर लोकांना लस उपलब्ध करण्याबाबत पुढाकार घेतला यासाठी त्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच बायोटेक व सीरम यांनी अथक परिश्रम घेऊन ही लस सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली यासाठी त्यांचेही अभिनंदन. सध्या राज्यात 5 सरकारी हॉस्पिटलमध्ये तर 2 खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम सुरु आहे, असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
गोमॅकोमध्ये लसीकरण मोहिमेसाठी खास विभाग तयार करण्यात आला आहे. एकदा या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर पुन्हा 28 दिवसांनी या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. यानंतर 14 दिवसांनी रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्यामुळे लोकांनी लस घेतल्यानंतर बिनधास्त न राहता मास्क व सामाजिक अंतराचे पालन करावे. त्याचप्रमाणे लस दिल्यानंतर लाभार्थीला प्रमाणपत्र व डोस कार्ड देण्यात येणार आहे ते सांभाळून ठेवावे, असे गोमॅकोचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.
सध्या सात विविध ठिकाणी 700 लोकांना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक एक सेंटरमध्ये सुमारे 100 लोकांना लस देण्यात येणार आहे. यानंतर 40 आरोग्य केंद्र स्थापन करुन प्रत्येक केंद्रात सुमारे 40 हजार लोकांना लस देण्यात येणार आहे, असेही डीन डॉ. बांदेकर यांनी पुढे सांगितले.