सुदीप ताम्हणकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्याठिकाणी घोटाळे, कांड करून लहान समाजाला तुडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रकारात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही मागे नाहीत. प्रामाणिकपणे शिकून उत्तीर्ण झालेल्या गोमेकॉतील विद्यार्थ्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न करून जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यात नातेवाईक असल्याने कोरोनाचे कारण पुढे करून त्यांना पास करण्याचे कटकारस्थान मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर व पिंटो करत आहेत. हे बेकायदेशीर कृत्य मुख्य़मंत्री व डीन यांनी त्वरित थांबवावे आणि जे नापास झालेले 21 विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेला बसू देऊ नये अशी मागणी अखिल गोवा बसमालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
सध्या गोमेकॉचे शिकविणारे कर्मचारी आणि डीन यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहे. गोमेकॉ हे जुने आणि विश्वासू हॉस्पिटल मानले जाते. ज्यावेळेपासून गोमेकॉ सुरू झाले तेव्हापासून नावलौकिक आहे. याचमुळे बाहेरील राज्यातील लोक याठिकाणी येतात. परंतु आता गोमेकॉला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नजर लागली आहे.
गोमेकॉत एमबीबीएस विद्यार्थी जे अंडर ग्रॅज्युएट आहेत ते मेडिकल काऊन्सिलचे मार्गदर्शक तत्त्वे पाळून उत्तीर्ण होण्यासाठी येतात. यातील तीस विद्यार्थी इंटर्नल असेसमेंट परीक्षेसाठी बसले ते पन्नास टक्के खाली गुण मिळाले म्हणून नापास करण्यात आले. या तीस विद्यार्थी मुख्य़मंत्र्यांचा पुतण्याही होता. पुतण्या नापास झाल्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. परंतु या परीक्षेत 21 नापास झाले आणि नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काही काळानंतर गोमेकॉ विभाग प्रमुख पिंटो यांनी कोरोना काळ असल्यामुळे 21 विद्यार्थ्यांना शेवटची परीक्षा घेऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेऊन जे प्रामाणिकपणे उत्तीर्ण झाले त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. बेकायदेशीर कृत्य करून लोकांचे जीव धोक्यात घातले आहे. याबद्दलची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दाखल केली आहे. याशिवाय मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया, गोवा विद्यापीठांकडे देण्यात आली आहे. या कटकारस्थानात डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि पिंटो यांचा हात असून हे प्रकार लवकरात लवकर थांबवावे असा इशारा सुदीप ताम्हणकर यांनी यावेळी दिला.