बुधवारी रात्रीही गोमेकॉत तोच गोंधळ : ऑक्सिजन अभावी 15 जणांचे मृत्यू : ऑक्सिजन पुरवण्यात येतेय अपयश
ऑक्सिजन टँकर बांबोळीत पोहोचवण्याचा आदेश
कुंकळ्ळी, वेर्णा येथील दोन कंपन्यांना केले प्रतिवदी
केंद्र सरकारकडून गुरुवारी 323 कॉन्स्ट्रेटर दाखल
प्रतिनिधी / पणजी
ऑक्सिजनअभावी गोमेकॉ इस्पितळात आजपासून एकही मृत्यू होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश देऊनही बुधवारी दि. 12 मे रोजी रात्री 40 कोविड रुग्ण दगावले. त्यातील 15 जणांनी पहाटे 2 ते 6 वा. च्या काळात ऑक्सिजन नसल्याने प्राण सोडले. याची गंभीर दखल गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने काल गुरुवारी घेतली आणि गोमेकॉत ऑक्सिजनची मोठी टाकी उभारण्याचा आदेश दिला. तसेच गोव्याला ऑक्सिजनचा अधिक कोटा देण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला आहे. ऑक्सिजननिर्मिती करणाऱया गोव्यातील आणखी दोन कंपन्यांना प्रतिवादी करून घेतले असून ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य न झाल्यामुळे मृत्यू होत आहेत आणि प्रशासन काहीच करू शकत नसल्याने न्यायालयाने दुःख व्यक्त केले आहे.
कोरोना महामारी हाताळण्यास सरकार कमी पडत असल्याने याप्रकरणी न्यायप्रविष्ठ झालेल्या याचिकांवर सलग सुनावणी घेण्याचा काल गुरुवारचा तिसरा दिवस होता. ऑक्सिजन ट्रॉली गोमेकॉत नेण्यासाठी ट्रक्टर लागतात आणि ट्रक्टरचालक गोव्यात नाहीत. त्यामुळे गोमेकॉपर्यंत जेव्हा ट्रॉली बदलली जाते तेव्हा ऑक्सिजनचा दाब कमी होतो, अशी कबुली सरकारी अधिकाऱयांनी दिली तेव्हा उच्च न्यायालयाने दुःख व्यक्त केले.
कुंकळ्ळी, वेर्णा येथील दोन कंपन्यांना केले प्रतिवदी
उच्च न्यायालयासमोर सुनावणीस असलेल्या याचिकेत खोर्ली-मळार येथील मेसर्स स्कूप इंडस्ट्रीज प्रा. लि. या एकाच ऑक्सिजन निर्मिती करणाऱया कंपनीला प्रतिवादी करून घेण्यात आले होते. आता न्यायालयाने कुंकळ्ळी येथील ऑक्सिजन प्लांट प्रा. लि. व वेर्णा येथील मेसर्स एस. ए. ऑक्सिनायट्रो प्लांट प्रा. लि. या दोन आस्थापनांनाही प्रतिवादी करून घेतले आहे.
मेसर्स स्कूप इंडस्ट्रीजच्या तांत्रिक अधिकाऱयांनी तात्काळ गोमेकॉत जावे आणि आजच्या आज दोन डय़ुरा सिलिंडर सुरू करावे, असा आदेश न्यायालाने दिला आहे.
गुरुवारी 323 कॉन्स्ट्रेटर दाखल
ऑक्सिजन सिलिंडर कमी पडत असल्याने आता 323 कॉन्स्ट्रेटर गोव्यात आणले आहेत. ते आजच्या आज गोमेकॉत वापरण्यासाठी उपलब्ध केले जातील, अशी माहिती आरोग्य सचिव रवी धवन यांनी न्यायपिठाला दिली. हे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर कसे वापरावे याचे प्रशिक्षणही दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत अहवाल द्यावा
आरोग्य सचिवांनी उच्च न्यायालयासमोर संध्याकाळी 6 वा. पर्यंत ईमेलद्वारे अहवाल सादर करावा हा अहवाल समाधानकारक असल्यास पुढील सुनावणी सोमवार दि. 17 मे 2021 रोजी होईल. अहवाल असमाधानकारक असल्यास शनिवार दि. 15 रोजी होईल. त्यासाठी प्रतिवाद्यांनी तयारीत रहावे, असाही आदेश दिला आहे.
ऑक्सिजन फ्लो मीटरचा गोंधळ
ऑक्सिजन सिलिंडर अर्धवट भरलेले असतात, असा आरोप सुनावणीवेळी झाला तेव्हा डॉ. खांडेपारकर यांनी हस्तक्षेप केला आणि प्रत्येक सिलिंडरला फ्लोमीटर गेज असते. त्यातून ऑक्सिजनचा दाब समजतो व त्याची नोंद केली जाते, अशी माहिती दिली. असे फ्लो मीटर फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे सिलिंडर असूनही वापरले जात नाहीत, असा आरोप करण्यात आला. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे फ्लोमीटरचे प्रमाणही त्याप्रमाणे ठरले पाहिजे, असे न्यायपीठाने सुचविले तेव्हा हा गोंधळ सोडवण्यासाठी लक्ष घातले जाईल, असे आश्वासन डॉ. खांडेपारकर यांनी दिले.
रेड क्रेस, रोटरी क्लब आदी एनजीओ ऑक्सिजन सिलिंडर भरुन नेतात. काही रुग्णांना खासगीरित्या सिलिंडर लागतो, पण तुटवडा असल्यामुळे त्यांना मान्यता दिली जात नाही. ही मान्यता देण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जाईल, असे ऍडव्होकेट जनरलनी उच्च न्यायालयाला सांगितले.
नायट्रोजनची टाकी वापरणार
गोमेकॉत ऑक्सिजनचा साठा करून ठेवण्यासाठी नवी टाकी आणण्यास उशीर लागू शकतो. त्यामुळे गोव्यातील एका आस्थापनाकडे असलेली नायट्रोजन वायू साठवणारी टाकी तातडीने आणून त्यात ऑक्सिजन साठवला जाईल. त्यापूर्वी ती स्वच्छ करण्यासाठी काही रासायनिक प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी एका दिवसाचा अवधी लागेल. ही टाकी कार्यरत झाल्यास ऑक्सिजनचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली.
केंद्र सरकारने गोव्याचा ऑक्सिजनचा कोटा वाढवावा
ऑक्सिजन निर्मिती कमी प्रमाणात होते व मागणी अधिक आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने गोव्यात ऑक्सिजनचे अधिक टँकर पाठवावेत. गोव्याचा ऑक्सिजन कोटा वाढवावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. हा कोटा मिळवण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तो आणण्याची व्यवस्था करावी. गोव्यातील इतर इस्पितळांना ऑक्सिजनचा कोटा कमी पडू दिला जाऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
… अन् न्यायमूर्ती झाले भावनावश
मृत्यूचे थैमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती तथा गोमंतपुत्र न्या. महेश सोनक व न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी सर्व सरकारी यंत्रणेला एक सुत्रात आणण्याचा प्रयत्न केला. सर्व यंत्रणा चालीस लावली. मृत्यू होणार नाहीत याचे वचनही घेतले. तरीही त्याच कारणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले हे ऐकून न्यायमूर्ती सोनक भावनावश झाले. काही काळ सर्व वातावरण स्थब्ध झाले. कोणच काही बोलेना. शेवटी न्यायमूर्तीनी ‘सॉरी’ असा शब्द वापरून मौन सोडले. मृत्यूचे थैमान थांबले पाहिजे. काहीही करा ‘लॉजिस्टीक’मुळे परत मृत्यू झालेले आपल्याला नको आहेत, असे ते म्हणाले.
रुग्णांच्या प्रियजनांचाही विचार करायला हवा
ऑक्सिजनसाठी श्वास कोंडला जात आहे. रुग्णांच्या बाजूला त्यांचे जवळचे व प्रियजन आहेत तेही हतबल आहेत. त्यांच्यावर काय ओढवले जात आहे? याचा विचार व्हायला हवा. ऑक्सिजन पुरवठा आहे, पण यंत्रणा व्यवस्थित नसल्याने रुग्ण दगावत आहेत, असे यापुढे होणार नाही याची काळजी घ्या व परत तेच तेच सांगण्याची पाळी आणू नका, असे न्यायपीठाने सुनावले.