लक्षणे नसलेल्यांना गृह अलगीकरणास परवानगी
प्रतिनिधी / पणजी
गोमेकॉतील परीक्षा केंद्र असलेल्या हॉलचे रुपांतर कोविड हॉस्पिटलात करण्यात आले असून तेथे सर्व सोयींनी युक्त अशा 150 बेडची कोरोना रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. इतर सरकारी इस्पितळातही शक्य असेल तेथे बेड वाढविण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. या दोघांनीही गोमेकॉला भेट देऊन तेथील एकंदरित कोरोना रुग्णांच्या सोयी – सुविधांची पाहणी केली.
गृह अलगीकरणासाठी परवानगीची आवश्यकता नाही
राज्य सरकारने रोगसूचक लक्षणे नसलेल्या रूग्णांना घरातच अलगीकरणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगीची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत कोणालाही इस्पितळात प्रवेश घेण्याचा सल्ला दिला जात नाही तोपर्यंत सर्व बाधितांची प्रकरणे घरातच अलगीकरणासाठी असल्याचे मानली जाईल. त्यांना आरोग्य केंद्रातून औषधोपचाराची पाकिटे मिळण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.केंद्र सरकारने गोव्यासाठी वैद्यकीय ऑक्सिज कोटय़ात दिवसाला दहा मेट्रिक टनने वाढ केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अठरा वर्षांवरील लोकांचे लसीकरण लांबणीवर
18 ते 45 वर्षांपर्यंतच्या लोकांना लस देण्यासाठी साठा आलेला नाही. तो येताच त्यांना लस देण्याचे काम सुरु होईल. म्हणून 18 वर्षांवरील लोकांनी आज शनिवार दि. 1 मे पासून आरोग्य केंद्रात किंवा लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये. त्यांना सध्या तरी लस मिळणार नाही. सरकारने 5 लाख डोसची मागणी नोंदवली आहे, परंतु तो उपलब्ध झालेला नसल्याने 1 मे पासून देता येणार नाही, असा खुलासा डॉ. सावंत यांनी केला आहे.