कोरोनाची लाट शिगेला पोहोचली तरी गोमेकॉत सावळा गोंधळच, : मुंबई उच्च न्यायालयात उघड झाले खळबळजनक वास्तव
- सात प्रकल्प बंद पडले तरी आरोग्य खाते, सरकार सुस्त
- पुरवठादारांना बिले न दिल्याने ऑक्सिजन पुरवठा बंद
- ऑक्सिजन प्रेशर गेज बसवण्याकडेही खात्याची अनास्था
- न्यायालयाने चपराख दिल्यानंतर सुरळीत करण्याचे उत्तर
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचली असताना गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील 8 पैकी 7 पीएसएस ऑक्सिजन प्रकल्प चालत नाहीत, अशी खळबळजनक माहिती मुंबई उच्च न्यायालयासमोर उघड झाली असून ऑक्सिजन पुरवठा करणाऱयांना सरकारने पैसेच दिलेले नाहीत, असे न्यायपीठाला सांगण्यात आले. सरकारच्या या कारभारावर खर शब्दांत चपकराक ओढताच ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरळीत करण्याचे उत्तर सरकारने दिले. पुढील सुनावणी 7 मार्च 2022 रोजी ठेवण्यात आली आहे.
ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे कोविड रुग्णांचा पटापट मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका नोंदवून घेतली होती. दक्षिण गोवा वकील संघटना तसेच ऍड. अमित पालेकर यांचीही याचिका दाखल करून घेतली होती.
बिले न दिल्याने ऑक्सिजन पुरवठा बंद
वारंवार सरकारी अधिकाऱयांना वठणीवर आणल्यावर गोमेकॉत 8 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व आरोग्य खात्याच्या इस्पितळात 9 ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्यात आले. ऑक्सिजन पुरवठा करणाऱयांची बिले मंजूर झालेली नाहीत. त्यांना पैसा देण्यात न आल्याने ऑक्सिजन पुरवठा बंद झाला आहे.
आरोग्य खाते, सरकार सुस्त
गोमेकॉतील 8 प्रकल्पांपैकी 7 प्रकल्प चालत नाहीत. फक्त एकच चालतो. तरी सरकार गप्प आहे. या प्रश्नाची उच्च न्यायालयाने दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने कोरोना प्रकरणातील काही प्रश्न सुटले आहेत. उच्च न्यायालायाचा हस्तक्षेप होत असल्याची कल्पना असूनही गोमेकॉतील ऑक्सिजन पुरवठय़ाची परिस्थिती बिकट झाली आहे. एकूण 8 प्रकल्पांपैकी फक्त एकच चालतो. तोही कुठल्या क्षणी बंद पडू शकतो. सात प्रकलप बंद आहेत तरी प्रशासन सुस्त आहे.
आरोग्य खात्यात 9 प्रकल्प बसवण्यात आले. त्यातील चिखलीचा सोडल्यास सर्व प्रकल्प चालतात, अशी माहिती न्यायपीठाला देण्यात आली.
प्रेशर गेज बसवण्याची तसदी नाही
चिखली इस्पितळात ऑक्सिजन पुरवठय़ाच्या 70 खाटा आहेत. पैकी 25 खाटांनाच ऑक्सिजन पुरवठा होतो. ऑक्सिजन प्रेशर गेज हे साधे उपकरण नसल्याने आणि ते खरेदी करून बसवण्याची तसदी कोणीच न घेतल्याने ऑक्सिजन प्रकल्प चालत नाहीत, अशी माहिती न्यायपीठाला देण्यात आली.
सरकारचा एवढा हलगर्जीपणा लक्षात येताच न्या. महेश सोनक व न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या न्यायपीठाने सरकारला धारेवर धरले. युद्धपातळीवर हालचाली करून परिस्थिती लगेच सुधारली जाईल, असे आश्वासन ऍडव्होकेट जनरलनी दिले. या कारभारावर कडक ताशेरे ओढून पुढील सुनावणी न्यायपीठाने 7 मार्च 2022 रोजी ठेवली आहे.
कोरोना : 9 बळी, 655 बाधित
कोरोनाच्या तिसऱया लाटेत राज्यात बळींची वाढलेली संख्या अद्यापही वाढतीच नोंद होत असून बुधवारी 9 जणांचे मृत्यू झाले आहेत. तर गत 24 तासात 655 बाधित सापडले आहेत. बुधवारच्या 9 बळींमुळे आतापर्यंतच्या एकुण बळींची संख्या 3708 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 7051 सक्रिय रुग्ण आहेत तर 24 तासात 1465 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारी एकूण 3912 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 655 बाधित सापडले. त्यापैकी 47 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले, तर 608 जणांना गृह विलगिकरण देण्यात आले. 38 जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत. वर्षभरातील बाधितसंख्या 240471 तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 229712 वर पोहोचली आहे.
- 02 फेब्रुवारीपर्यंतचे एकूण रुग्ण 240471
- बरे झालेले रुग्ण 229712
- सक्रिय रुग्ण 7051
- नवीन रुग्ण 655
- बरे झालेले रुग्ण 1465
- कोरोना बळी 9
- वर्षभरातील एकूण बळी 3708