रोड शो करत योगींच्या मतदारसंघात प्रचार
उत्तरप्रदेश निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपण्यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला होता. याचनुसार आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष आणि भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रोड-शो करत शक्तिप्रदर्शन केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शहरात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी हा रोड शो पूर्ण केला आहे.
आझाद यांनी गोरखपूर शहर मतदारसंघात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलले आहे. प्रचारादरम्यान ते सातत्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप करत आहेत. मुख्यमंत्री योगी हे पाच वर्षांच्या कार्यकाळादरम्यान निवडक लोकांसाठीच काम करत राहिले. गोरखपूरची जनता आता परिवर्तन इच्छित आहे. यंदाच्या निवडणुकीत योगींच्या हुकुमशाही भूमिकेचा अंत होणार असल्याचा दावा आझाद यांनी केला आहे.