वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळच्या 4 दिवसीय दौऱयावर असलेले भारतीय सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या पत्नींनी काठमांडूत नेपाळी गोरखा सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यादरम्यान त्यांनी गोरखा सैनिकांसाठीच्या भेटवस्तू त्यांच्या पत्नींना सोपविल्या आहेत. हे गोरखा सैनिक जनरल नरवणे यांच्या दिल्लीतील साउथ ब्लॉक कार्यालयात तैनात आहेत. वीणा नरवणे या आर्मी वाइव्स वेलफेयर असोसिएशनच्या अध्यक्षाही आहेत.
सैन्यप्रमुखांच्या पत्नीला भेटल्यावर गोरखा सैनिकांचे कुटुंबीय अत्यंत आनंदी दिसून आले. कोरोना विषाणूमुळे नेपाळने स्वतःची सीमा सर्वसामान्यांसाठी बंद केली असल्याने सणासुदीत गोरखा सैनिक स्वतःच्या कुटुंबीयांना भेटू शकलेले नाहीत.
नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी जनरल नरवणे यांना गुरुवारी एका विशेष समारंभात नेपाळ सैन्याच्या जनरलचे मानद पद प्रदान केले होते. जनरल नरवणे यांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचीही भेट घेतली होती. ओली हे नेपाळचे संरक्षण मंत्री देखील आहेत.