वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटीच्या ताज्या मानांकनात गोलंदाजी व अष्टपैलूंमध्ये दुसरे स्थान कायम राखले आहे. कसोटी अष्टपैलूंत रविंद जडेजाने तिसरे स्थानही राखले आहे.
कसोटी फलंदाजांमध्ये रोहित शर्मा व विराट कोहली यांनीही अनुक्रमे पाचवे व सातवे स्थान कायम राखले आहे. रोहितने 797 तर कोहलीने 756 रेटिंग गुण मिळविले आहेत. फलंदाजांत ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशानेने 915 गुणांसह अग्रस्थान, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने 900 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने (879) ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला (877) मागे टाकत तिसरे स्थान मिळविले आहे. रोहित, डेव्हिड वॉर्नर, कोहली, लंकेचा दिमुथ करुणारत्ने, पाकचा बाबर आझम व ऑस्ट्रेलियाचा टॅव्हिस हेड यांनी पहिल्या दहांमधील उर्वरित स्थाने मिळविली आहेत.
कसोटी गोलंदाजांत अश्विन हा एकमेव भारतीय गोलंदाज टॉप टेनमध्ये आहे. 883 गुणांसह तो दुसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने यात आघाडीचे स्थान कायम राखले असून पाकचा डावखुरा जलद गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी तिसऱया स्थानावर आहे. न्यूझीलंडचा टिम साऊदी व इंग्लंडचा जेम्स अँडरसन यांनी पुढचे दोन क्रमांक मिळविले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर स्कॉट बोलँडनेही बॉक्सिंग डे कसोटीत चमकदार प्रदर्शन करीत आयसीसी कसोटी मानांकनात स्थान मिळविले आहे. त्याने बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱया डावात इंग्लंडचे 7 धावांत 6 बळी मिळविल्याने त्याने आता 271 रेटिंग गुणांसह 74 वे स्थान मिळविले आहे. या सामन्यात त्याने 7 बळी मिळविले. कसोटी अष्टपैलूंत भारताचे अश्विन (360 गुण) व जडेजा (346) यांनी विंडीजचा जेसॉन होल्डर (382) याच्यानंतर दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे. बांगलादेशचा शकीब अल हसन चौथ्या, मिशेल स्टार्क पाचव्या, बेन स्टोक्स सहाव्या स्थानावर आहे.
कसोटी संघांच्या मानांकनात 124 गुणांसह भारत अग्रस्थानी असून न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया दुसऱया व तिसऱया स्थानावर आहेत. इंग्लंड चौथ्या व पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे.