वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी वेगवान गोलंदाज पारस म्हांब्रे भारतीय संघासाठी नियुक्त करण्यात येणाऱया गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी इच्छुक आहे. म्हांब्रेने या पदासाठी आपला अर्ज भारतीय क्रिकेट मंडळाकडे पाठविला असल्याची माहिती मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.
भारताच्या 19 वर्षांखार्लींल तसेच अ संघाला पारस म्हांब्रेचे मार्गदर्शन मिळाले होते. भारताच्या या दोन्ही संघांनी विविध स्पर्धांमध्ये चांगले यश प्राप्त केले होते. गेल्या जवळपास दशकाच्या कालावधीत पारस म्हांब्रे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये कार्यरत आहे. भारताच्या 19 वर्षाखालील तसेच अ गटाचे म्हांब्रे प्रमुख प्रशिक्षक होते.
49 वर्षीय म्हांब्रेने 1996 ते 1998 या दोन वर्षांच्या कालावधीत दोन कसोटी आणि तीन वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. मुंबईच्या रणजी संघाकडून खेळताना 1990 च्या दशकामध्ये म्हांब्रेने 91 प्रथमश्रैणी सामन्यात 284 बळी घेतले असून त्याने 13 वेळा एका डावात पाचपेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. बंगाल संघाला रणजी करंडक मिळवून देण्यास म्हांब्रेचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले होते. म्हांब्रेने यापूर्वी बडोदा संघालाही प्रशिक्षण दिले आहे.