प्रतिनिधी /बेळगाव
रसिकरंजन आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी पुरस्कृत गोल्डन व्हाईस ऑफ बेलगामच्या उपांत्यपूर्व फेरीला रविवार दि. 26 पासून सुरूवात होणार आहे. कोनवाळगल्ली येथील लोकमान्य रंगमंदीर येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून स्पर्धा घेतली जाणार आहे. 1970 च्या दशकातील हिंदी गीतांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रसिकरंजनच्या माध्यमातून या स्पधेचे आयोजन केले जात आहे.
एकूण 8 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मारवा, कल्याण, बसंत, केदार, भूपाळी, जोग, शिवरानंजनी व असावरी या आठ संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरी होणार आहे. या आठही संघांच्या स्पर्धकांना रसिक रंजनतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे संचालक अनिल चौधरी यांनी स्पर्धकांना स्पर्धेतील पुढील भागाविषयी माहिती दिली. 70 च्या काळातील गीतकारांची गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. या बैठकीला रसिकरंजन व लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते. कोरोनामुळे अनेक नागरिकांना स्पर्धेचा आस्वाद घेता येत नाही. यासाठी तरुण भारतच्या फेसबुक पेजवरून नागरिकांना घरबसल्या ही स्पर्धा पाहता येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून हॉटेल समुद्र तर मिडिया पार्टनर तरुण भारत असणार आहे. मागील काही वर्षात स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने स्पर्धकांची संख्या दरवषी वाढत आहे. बेळगावच्या कलाकारांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम महत्वाची भुमिका बजावत आहे.