उपउपांत्य फेरीला सुरुवात : लोकमान्य को-ऑप. सोसायटी-रसिक रंजनतर्फे स्पर्धेचे नेटके आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
जुन्या चित्रपट गीतांच्या सुंदर मिलाफाने गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगामच्या उपउपांत्य फेरीत रंगत आणली. मंगळवारपासून सुरू झालेल्या या उपउपांत्य फेरीत एकूण बारा संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी 8 संघांनी प्रत्येकी पाच गाणी सादर करत उपस्थितांकडून वाहवा मिळविली.
जुन्या काळातील हिंदी गीतांना आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम स्पर्धेचे आयोजन मागील काही वर्षांपासून केले जात आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी व रसिक रंजनतर्फे या स्पर्धेचे नेटके आयोजन केले जात आहे. त्यामुळेच ही स्पर्धा आता व्यापक स्वरुपात घेतली जात आहे.
मंगळवारी उपउपांत्य फेरीमध्ये स्पर्धकांनी एकाहून एक सरस अशी गाणी सादर केली. उर्वरित चार संघांची गाणी बुधवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे होणार आहेत. परीक्षक म्हणून प्रा. अनिल चौधरी, भारती कित्तूर व आर. आर. कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी जुन्या गीतांचे अनेक श्रोतृवर्ग उपस्थित होते.
तरुण भारतमुळे घेता आला घरबसल्या गाण्यांचा आस्वाद
या स्पर्धेच्या उपउपांत्य स्पर्धेचे थेट प्रक्षेपण तरुण भारतच्या फेसबूक पेजवरून केले जात होते. त्यामुळे श्रोत्यांना घरबसल्या या जुन्या गीतांचा मनमुराद आस्वाद घेता आला. कोरोनामुळे अनेकांना आवड असूनही कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसले तरी त्यांनी फेसबूक पेजवरून गाण्यांचा आस्वाद घेतला. यामुळे श्रोतृवर्गातून तरुण भारतचे आभार मानण्यात आले.