प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी प्रस्तुत व रसिक रंजन बेळगाव आयोजित गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगावची अंतिम फेरी दि. 7 नोव्हेंबर रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे तरुण भारत मीडिया पार्टनर असून ‘हॉटेल समुद्र’ हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहे.
हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगातील जुन्या गीतांची नव्या पिढीला गाण्याची अनोखी संधी या कार्यक्रमामुळे प्राप्त झाली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पुढील संघ पात्र ठरले आहेत. जोग, भूपाळी, शिवरंजनी व मारवा संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असणार आहे. विजेत्यांना भरघोस बक्षिसे मिळणार आहेत. या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे बेळगावच्या तरुण गायकांनी आव्हाने स्वीकारून ही जुनी गाणी लिलया पेश करून रसिकांची वाहवा मिळविली आहे.
टीम रसिक रंजनने सर्व कलाकारांकडून भरपूर सराव करवून योग्य मार्गदर्शन केल्याने कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली आहे. अनिल चौधरी, भारती कित्तूर व आर. आर. कुलकर्णी यांनी परीक्षणाची चोख कामगिरी बजावली असून स्पर्धकांना उत्कृष्ट मार्गदर्शनही केले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच आयोजन केल्याने रसिक प्रेक्षकांची खूप गर्दी होत आहे. अंतिम फेरीसाठी प्रेक्षकांना अतिथी प्रवेशिका दाखवूनच प्रवेश देण्यात येणार आहे. एका व्यक्तीस केवळ दोनच अतिथी प्रवेशिका मिळतील. सदर अतिथी प्रवेशिका लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, गुरुवारपेठ मुख्यालय व लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्लीत उपलब्ध आहेत. गुरुवार दि. 28 पासून अतिथी प्रवेशिका उपलब्ध होतील. रसिकांची निराशा टाळण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियातर्फे लाईव्ह प्रक्षेपण युटय़ूबवर होणार आहे.