वाळपई प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांपासून गाजणाऱया वाघांच्या मृत्यूप्रकरणातील एका वाघाची गायब झालेली नखे अखेर गोळावली येथील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात सापडली आहेत. ती गायब झाल्याने तपासयंत्रणेसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने वेगवेगळय़ा स्तरावर या संदर्भात चौकशी करण्यात येत होती.
पंधरा दिवसांपूर्वी गोळावली येथील सिद्धेश्वराची गुंफा या ठिकाणी पारंपरिक भुगत उत्सव साजरा करण्यासाठी गेलेल्या भाविक व नागरिकांना एका वाघाचा मृत्यू उघडकीस आला होता. त्यानंतर एकूण चार वाघांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. 5 जानेवारी रोजी सापडलेल्या वाघाची सर्व नखे गायब होती. तपास अधिकारी नंदकुमार परब यांनी वाघाच्या नखांसंदर्भात वेगवेगळय़ा स्तरावर चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून त्यांना अपेक्षित प्रमाणात यश आले नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या तपास यंत्रणेने गावकऱयांवर दबाव घालून शेवटी सिद्धेश्वराला साकडे करण्याची विनंती केली. नागरिकांनी सिद्धेश्वराला साकडे घालून गायब असलेली नखे ताबडतोब सापडू दे अशा प्रकारचे विनवणी केली होती.
मंदिराच्या आवारात सापडली नखे
देवस्थानाची पूजाअर्चा करण्यासाठी दररोज येणारा पुजारा देमको खोत काल मंगळवारी सकाळी देवस्थानच्या प्रांगणात आला असता त्याला गर्भगृहाच्या शेजारी संशयास्पद पिशवी आढळली. याबाबतची माहिती त्यांनी आपले बंधू नारायण खोत याना दिली. इतर नागरिकांच्या उपस्थितीत यासंदर्भाची माहिती वनखात्याचे कर्मचारी व स्थानिक भागातील नागरिक प्रेमकुमार गावकर यांना दिली. त्यांनी आपल्या वरि÷ अधिकाऱयांना माहिती देण्यात आल्यानंतर नंदकुमार परब, विलास गावस व इतर कर्मचाऱयांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. पिशवीची सविस्तरपणे पाहणी करण्यात आल्यानंतर नखे असल्याचा संशय बळावला
श्वानपथकाला पाचारण
नखा संदर्भाचा संशय बळावल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवराम वांयगणकर यांच्यामार्फत श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. सर्वप्रथम श्वानपथकाला मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आल्यानंतर श्वानपथक सरळ देवस्थानापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या एका नवीन बांधकाम करण्यात येत असलेल्या टाकीजवळ गेले. मात्र त्यानंतर कोणत्या प्रकारचा संशय समोर आला नाही.
वाघाच्या नखांचे कनेक्शन दोडामार्गपर्यंत
देवस्थानच्या प्रांगणात सापडलेली नखे पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेली आहे. यावेळी ठाणे पंचायतीच्या सरपंच प्रजिता गावस उपस्थित होत्या. ही नखे गायब करण्याच्या प्रकारात कुणाचा हात आहे यासंदर्भात चौकशी सुरू असून त्याला लवकरच चांगल्या प्रकारची गती प्राप्त होणार आहे. अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नसून वेगवेगळय़ा स्तरावर चौकशी सुरू आहे. नखांचे कनेक्शन दोडामार्गपर्यंत गुंतले असून यात सदर गोळावली गावातील काही सरकारी कर्मचाऱयांचाही सहभाग असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.