महादेव सावकार गोळीबार प्रकरण : मुख्य सूत्रधार अद्याप फरार
वार्ताहर/ विजापूर
2 नोव्हेंबरला कन्नाळ क्रॉसजवळ महादेव सावकार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अटकसत्र सुरू केले आहे. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली असून आता पुन्हा 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत 19 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करून या हल्ल्यातील संबंधितांना अटक करण्यात येणार आहे. मात्र, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मडिवाळ हिरेमठ अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तर या गोळीबारात गंभीर झालेल्या महादेव सावकारांवर हैदराबाद येथे उपचार सुरू आहेत.
हसनडोंग्री महबुब बडेगर (वय 24), कल्लाप्पा अशोक बजंत्री (वय 24) व इरण्णा अशोक बजंत्री (वय 21, तिघे रा. इंडी रोड, विजापूर), संघर्ष संजय सूर्यवंशी (वय 23, रा. इंडी), संगाप्पा गुरुबसप्पा यमदे (वय 35, रा. उमराणी, ता. इंडी), चेतन चन्नबसप्पा शिरडोळ (वय 30, रा. जलनगर, विजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाईल, एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत डीवायएसपी डॉ. राम अरसिद्धी, के. एस. लक्ष्मीनारायण, एम. के. द्यामण्णावर, सीपीआय सुनील कांबळे, बसवराज मुकर्तीहाळ, सोमशेखर जुट्टल आदींनी सहभाग घेतला होता.