लुटमारीसाठी दुकानात घुसून झाडली गोळी, मठ गल्ली येथील घटना, व्यापाऱयांमध्ये घबराट
प्रतिनिधी/ बेळगाव
लुटमारीसाठी मठ गल्ली येथील एका दुकानात गोळीबार करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून व्यापाऱयांमध्ये घबराट पसरली आहे. गोळीबारानंतर दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांनी तेथून पलायन केले असून हल्ल्यात एक व्यापारी जखमी झाला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. आता व्यापाऱयांना लुटण्यासाठी गोळीबार करणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीतील गुन्हेगार कोण? याचा तपास करण्यात येत असून पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहेत. फुटेजवरुन सशस्त्र टोळीतील त्रिकुटाचा शोध घेण्यात येत आहे.
राकेश रुपचंद जैन (वय 46, रा. नरगुंदकर भावे चौक) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱयाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांचे सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उपलब्ध माहितीनुसार शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास मठ गल्ली येथील चेतना स्टेशनरी स्मार्ट या दुकानात ही घटना घडली आहे. शनिवारी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री दुचाकीवरुन तिघे जण राकेश जैन यांच्या दुकानासमोर आले. एकटा दुचाकीवरच बसून होता तर दोघा जणांनी दुकानात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर बिस्कीटाची पाकिटे व इनो देण्याची मागणी केली. त्यावेळी दुकान मालकाने हे होलसेल दुकान आहे. किरकोळ व्यापार केला जात नाही, असे सांगितले. त्याचवेळी दुकानात शिरलेल्या एकाने पिस्तूल काढले व कॅश काऊंटरमध्ये हात घालून रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. राकेश यांनी प्रतिकार करताच गोळीबार करण्यात आला व पिस्तुलाच्या मुठीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर रात्री जखमी राकेश यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पिस्तूल की कट्टा?
गोळीबारासाठी कोणत्या शस्त्राचा वापर करण्यात आला, याचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून फुटेजमध्ये सारा प्रकार कैद झाला आहे. घटनास्थळावरुन एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली असून गोळीबारासाठी गुन्हेगारांनी गावठी पिस्तूल की कट्टा याचा तपास करण्यात येत आहे.
पोलीस बंदोबस्तात… गुन्हेगार मैदानात…
बेळगाव पोलीस दलातील अधिकारी सध्या वेगवेगळय़ा बंदोबस्तात गुंतले आहेत. लाल-पिवळय़ासाठी कन्नड संघटनांचे सुरू असलेले आंदोलन व इतर बंदोबस्तात अधिकारी मग्न आहेत. हीच संधी साधून गुन्हेगार पूर्णपणे मैदानात उतरले असून गजबजलेल्या ठिकाणी बिनधास्तपणे गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचे काम गुन्हेगारी टोळय़ा करीत आहेत. चोऱया, घरफोडय़ांबरोबरच आता गोळीबार करुन लुटमारी करण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.