ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीतील शिवाजीनगर येथील बॉम्बे रुग्णालयाजवळ ही इमारत होती. तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आले आहे. या सातही जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची नावे : फैजल कुरेशी (वय 21), नमरा कुरेशी (वय- 17), शाहिना कुरेशी ( वय- 26). दरम्यान, जखमींपैकी शमशाद शेख व्यकीची ओळख पटली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.