प्रतिनिधी / देवगड:
दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना देवगड तालुक्यातील गोवळ तिठा-धनगरवाडी येथे घडली आहे. यात पत्नी दीपाली दीपक जंगले (34) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कणकवली पोलीस स्थानकात दाखल तक्रारीनुसार दीपालीचा पती दीपक लक्ष्मण जंगले या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरवाडी येथील दीपक जंगले याला दारुचे व्यसन आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दीपक हा घरी असताना त्याने दीपालीकडे दारुसाठी पैसे मागितले. मात्र, दीपालीने पैसे देण्यास नकार दिला. त्या रागाने दीपकने घरातील एका कॅनमधील रॉकेल दीपालीच्या अंगावर ओतले व माचिसने आग लावून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नजीकच्या ग्रामस्थांना लक्षात येताच त्यांनी आग विझवित दीपालीला तात्काळ कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दीपाली 50 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार संशयित दीपक जंगलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण तपासासाठी कणकवली पोलीस स्थानकाकडून विजयदुर्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.