प्रतिनिधी/ बेळगाव
गोवावेस येथील बसवेश्वर चौक ते शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गोवावेस येथून प्रारंभ करण्यात आले आहे. याकरिता येथील वाहतूक एका बाजूने वळविण्यात आली असून वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
बसवेश्वर चौक-डाक बंगला ते आनंदवाडीमार्गे बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सदर कामास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. नाथ पै चौकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पाईप घालण्यात येणार असून, संपूर्ण रस्ता काँक्रीटचा करण्यात येणार आहे. याकरिता ठिकठिकाणी पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या डाक बंगला ते बसवेश्वर चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात महापालिका व्यापारी संकुलाच्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आली आहे. सदर रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने मंगळवारी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. डेनेज वाहिनी घालण्यात आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. मात्र, आता याच रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. सदर रस्त्याचे काम प्रलंबित न ठेवता तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.