प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमुळे विकास कामांना ब्रेक लागला आहे. परंतु या काळातही शहरातील भागात रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. शहापूर ते गोवावेस पर्यंतचा रस्ता करून तीन महिने उलटले तरी अद्याप तो पूर्ण करण्यात आला नव्हता. अखेर याला लॉकडाऊनमध्ये मुहूर्त मिळाला. प्रियांका हॉटेल समोरच्या रस्त्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
नाथ पै चौक ते गोवावेस या दरम्यान रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात गोवावेस सर्कंल पासून ते कोरे गल्ली कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. त्यांनतर महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नाथ पै चौक ते प्रियांका हॉटेल पर्यंतचा रस्त्या करण्यात आला. या रस्त्यांचे काम पूर्ण होवून तीन महिने उलटले तरी अद्याप प्रियांका हॉटेल समोरचे पूर्ण करण्यात आले नव्हते. यामुळे स्थानिक व रहिवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
अखेर तीन महिन्यांनी का होईना, पण लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तरी या कामाला सुरूवात झाली. एका बाजूचे कॉंक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद असल्याने काम वेगाने संपविणे सोयीचे ठरत आहे. याच पद्धतीने शहराच्या इतर भागातही उर्वरीत असणारी कामे पूर्ण करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.