मनपाने जलतरण तलाव खुला करावा
प्रतिनिधी /बेळगाव
गोवावेस येथील महापालिकेच्या जलतरण तलावात असंख्य जलतरणपट्टू तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये बक्षीसे पटकाविली आहेत. मात्र कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या जलतरण तलावाचे टाळे अद्यापही खुले नाहीत. परिणामी जलतरणपट्टूंची गैरसोय होत असून खासगी जलतरण तलावात सराव करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मनपाने जलतरण तलाव खुला करावा, अशी मागणी होत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्वच व्यवसाय आणि उपक्रमांना ब्रेक लावण्यात आला होता. लॉकडाऊन, विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यू आणि क्लोजडाऊन अशा सरकारच्या नियमावलीमुळे जलतरण तलावदेखील बंद ठेवण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जलतरण तलाव बंद ठेवण्याचा आदेश राज्य शासनाने बजाविला होता. मात्र अलीकडे कोरोनाचे सर्व नियम शिथिल करून विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम, चित्रपटगृहे, सभासंमेलने घेण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.
मात्र गोवावेस येथील जलतरण तलाव अद्यापही खुला करण्यात आला नाही. सदर जलतरण तलाव बंदच ठेवण्यात आला असून जलतरण तलावाची देखभाल करणाऱया रोटरी क्लबचा करार संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जलतरणपट्टूंची गैरसोय झाली आहे.
जलतरणपटूंची गैरसोय
शहरातील जलतरणपट्टूंसाठी तसेच क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने गोवावेस येथे जलतरण तलाव निर्माण करण्यात आला होता. तसेच प्रारंभी महापालिकेकडून जलतरण तलावाची देखभाल करण्यात येत होती. मात्र नंतर ही जबाबदारी रोटरी क्लबकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रोटरी क्लबकडूनच जलतरण तलावाची देखभाल केली जाते. मात्र सध्या तलाव बंद असल्याने जलतरणपट्टूंची गैरसाय होत आहे.
शहरात आणखी तीन ठिकाणी जलतरण तलाव निर्माण करण्यात आले आहेत. हे तलाव देखील खुले करण्यात आले नाहीत. तर जलतरणपट्टूंसाठी गोवावेससह शहरातील सर्व जलतरण तलाव खुले करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.