वाहनांच्या लांबच लांब रांगा : कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या शहरात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. जेथे जाईल तेथे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. गोवावेस येथील बसवेश्वर सर्कल येथे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी तर चारीही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या वाहतूक कोंडीत वाहनचालक अडकून पडले होते.
लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यामुळे वाहनचालकांची संख्या रस्त्यांवर वाढू लागली आहे. एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत गटारी, रस्ते व इतर विकासकामे राबविली जात आहेत. तर दुसरीकडे यामुळे पर्यायी मार्गांवर भार वाढला आहे. यामुळे शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे.
बुधवारी दुपारी बसवेश्वर चौकात चारीही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिग्नल बसविण्यात आला असला तरी तो अद्याप कार्यान्वित नाही. तसेच या ठिकाणी कायमस्वरुपी रहदारी पोलीस नसल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. त्यामुळे कायमस्वरुपी वाहतूक पोलीस नेमून या ठिकाणचे सिग्नल सुरू करण्याची मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.