गोव्यातील रेल्वे दुपदरीकरणविरोधी निदर्शने
पणजी / प्रतिनिधी
मुरगाव बंदरातून कर्नाटकातील उद्योगांसाठी लागणाऱया कोळसा वाहतुकीसाठी पर्यावरणाचा तसेच गोव्यातील वनसंपदेचा नाश करुन हाती घेण्यात आलेले वास्को ते हॉस्पेट रेलमार्गाचे दुपदरीकरण दक्षिण पश्चिम रेल्वेने त्वरित बंद करावे, अशी मागणी करणारे निवेदन घेऊन काँग्रेसचे गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी इतर कार्यकर्त्यांसह काल मंगळवारी हुबळी येथील दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देऊन जोरदार निदर्शने केली.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक प्रशांतकुमार मिश्रा यांना भेटून चोडणकर व कामत यांनी दुपदरीकरणास गोव्यात प्रचंड विरोध होत असल्याचे सांगून लोक आता रस्त्यावर उतरल्याचे सांगितले. रेल्वे विकास निगमने त्वरित हे काम बंद न केल्यास गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सरव्यवस्थापकांना सांगून हे काम ताबडतोब बंद करुन सदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
घोषणा, फलकांसह जोरदार निदर्शने
मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते हुबळी येथे पोचल्यानंतर त्यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कार्यालयासमोर धरणे धरले. ‘आमका नाका आमका नाका, काळो कोळसो आमका नाका”’, ‘ओन्ली गोल से नो टू कोल’, ‘बंद करो बंद करो डबल टेकींग बंद करो’ अशा घोषणा व त्यांचे फलक हाती घेऊन निदर्शने करण्यात आली. संकल्प आमोणकर, अमरनाथ पणजीकर, जर्नादन भांडारी, जोसेफ डायस, विजय भिके, रोयला फर्नाडिस, डेनिका आल्मेदा, दामोदर शिरोडकर, वरद म्हार्दोळकर, सचिन परब, दशरथ मांदेकर, अभिजीत देसाई, मेघश्याम राऊत, ग्लेन काब्राल देवसुरभी यदुवंशी व इतरांनी जोरदार निदर्शने केली.
प्रशांतकुमार मिश्रा यांनी यावेळी शिष्टमंडळास त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर आपण वरिष्टांकडे बोलून योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. गोव्याचा निसर्ग हे एक मोठे वरदान असून, त्याचे रक्षण करणे सर्वांचेच कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील : कामत
गोव्याचा कोळसा हब करण्याच्या भाजप सरकारच्या प्रयत्नांना आम्ही कदापी सफल होऊ देणार नाही, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यावेळी बोलताना सांगितले. रेल्वे अधिकारीणीने आताच शहाणपण दाखवून कोळसा वाहतुकीसाठी करण्यात येणारे दुपदरीकरण बंद न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिगंबर कामत यांनी दिला आहे.
सरकारने काम ताबडतोब बंद करावे : चोडणकर
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकार लोकभावनांचा आदर न करता केवळ मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्याचा कोळसा हब करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करुन, सरकारने हे काम ताबडतोब बंद करण्याचा इशारा दिला.
दूधसागर जिवंत ठेवण्याची जबाबदारी रेल्वेचीही : रॉयला
कोळसा विरोधी आंदोलन तसेच सेव्ह मोले आंदोलनात अनेक मान्यवरांचा पाठिंबा आम्हाला मिळत असून, सरकारने भानावर येऊन पर्यावरणाचा नाश करणारे हे प्रकल्प रद्द करावेत. रेल्वे सरव्यवस्थापकांच्या कचेरीत गोव्यातील दूधसागराचे छायाचित्र असून, तो दुधसागर जीवंत ठेवण्याची जबाबदारी आता रेल्वेची आहे, असे रॉयला फर्नाडिस म्हणाल्या.
संकल्प आमोणकर, जोसेफ डायस, विजय भिके, जनार्दन भांडारी यांची कोळसा वाहतूक व रेल्वे दुपदरीकरणास विरोध करणारी भाषणे झाली.