मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन : जनजागृती महाअभियान रथ रवाना : 60 दिवसात 600 गावांना भेट देणार
प्रतिनिधी / पणजी
येत्या 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्तीदिनी होणाऱया सोहळ्यात राज्यातील आदर्श ग्रामपंचायती, पालिका, स्वयंपूर्ण मित्र यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. त्याचबरोबर राज्यातील पंचायती तसेच पालिकांना त्यांचा विशिष्ट प्रकल्प स्थापन करण्यासाठी 50 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंत मदत देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना लसीकरण जनजागृती महाअभियानचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. आल्तिनो येथील जॉगर्स पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमास त्यांच्यासोबत माहिती प्रसारण ब्युरोचे संतोष कुमार, रियाज बाबू, पीआयबीचे उपसंचालक विनोद कुमार, गोव्याचे माहिती संचालक सुधीर केरकर, आणि मान्यवर उपस्थित होते.
कोरोना लसीकरणासंबंधी अफवा आणि चुकीची माहिती रोखणे, लोकांच्या मनातील भीती-गैरसमज दूर करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे तसेच संबंधित माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे या उद्देशाने हे महाअभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत योजनेखालील केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, भविष्यातील धोरणे यासंबंघी माहिती नागरिकांना मिळावी, कौशल्य विकास, उद्योजकता, व्होकल फॉर लोकल यांचे महत्व लोकांना पटवून देणे हाही या अभियानचा हेतू आहे.
मोठय़ा एलईडी क्रीनचा समावेश असलेल्या अत्याधुनिक मल्टिमीडिया मोबाईल प्रदर्शन व्हॅनच्या आधारे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. एकूण 60 दिवसांच्या या मोहिमेत राज्यातील सुमारे 600 गावांना भेटी देणार आहे. त्याद्वारे स्थानिक लोकसंगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाद्वारे कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारतविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम डिजिटल डॅशबोर्डवर लाईव्ह ट्रक करण्यात येणार आहेत.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, गोवा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. जगातील अनेक देशात जेथे आजही लॉकडाऊनसारखी स्थिती आहे, तेथे भारतात कोरोनावरील लस निर्माण करून पहिल्या टप्प्यात 50 लाखपेक्षा जास्त लोकांना देण्यातही आली. ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे. गोव्यातही आतापर्यंत 9200 आरोग्य कर्मचारी आणि सुमारे 2 हजार कोरोनायोद्यांना लस देण्यात आली आहे. यापुढील टप्प्यात सर्वसामान्य लोकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. लोकांचे वयोमानानुसार गट बनविण्यात येणार असून दिवस निश्चित करून लस देण्यात येणार आहे. मात्र ही लस मोफत द्यावी की नाही यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा योजना, लसीकरण मोहीम यासंबंधी माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हा हेतू असून तो सफल होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आत्मनिर्भर भारत खाली केंद्राच्या 80 योजना आहेत. आतापर्यंत त्यातील सुमारे 35 योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वयंपूर्ण मित्रांना भेटा
स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक शनिवारी सकाळच्या सत्रात प्रत्येक ग्रामपंचायतीत उपस्थित राहणार असून केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी नागरिकांनी त्यांना भेटावे. खास करून तरुणांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. त्यातूनच गोवा स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल, याची आपणास पूर्ण खात्री आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
समईनृत्य सादरीकरणातून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुगे हवेत सोडून अभियानचा शुभारंभ करण्यात आला, तसेच बावटा दाखवून महाअभियान रथ रवाना करण्यात आला.