प्रतिनिधी/ फोंडा
गोव राज्य सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरी आजपासून पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. यानिमित्त आज शुक्रवार 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वा. कुर्टी येथील सहकार भवनमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सहकारमंत्री गोविंद गावडे, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक व अन्य मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थित असेल. यावेळी ‘मिल्कॉस्कॅन’ या दूध गुणवत्ता तपासणी यंत्राचे उद्घाटन व एन. डी. अगरवाल यांनी लिहिलेल्या सहकार कायदा विषयक पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वानुसार मर्यादित शेतकऱयांना कार्यक्रमाला निमंत्रीत करण्यात आल्याची माहिती डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी दिली आहे.
2 ऑक्टोबर 1971 साली स्थापना
2 ऑक्टोबर 1971 रोजी गोवा डेअरीचे उद्घाटन गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याहस्ते झाले होते. तेव्हापासून फोंडय़ात दूध प्रक्रिया प्रकल्प सुरु झाला. सुरुवातीला फोंडा डेअरी व नंतर गोवा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असे या संस्थेचे नाव होते. सन 1972 साली केंद्र सरकारने दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लड 2’ ही योजना आखली. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संस्थेला व्यापक स्वरुप देत गोवा राज्य दूध सहकारी संघ मर्यादित असे गोवा डेअरीचे नामकरण करण्यात आल्याची माहिती डेअरी प्रशासनाने दिले आहे.
दर दिवशी 60 हजार लिटर दूध संकलन
सध्या गोवा डेअरीचा विस्तार राज्यातील सर्व बाराही तालुक्यात झाला असून राज्यातील साधारण 15 हजार शेतकरी या संस्थेशी नोंद आहेत. त्यापैकी साडेचार हजार शेतकरी नियमित दूध पुरवठा करतात. अंदाजे 275 कर्मचारी या संस्थेत काम करतात. राज्यभरात 176 स्थानिक दूध संस्था गोवा डेअरीशी संलग्नीत आहेत. दिवसाकाठी 60 हजार लिटर दूध संकलीत होत असून बाजारातील विक्री 55 हजार लिटर आहे.