दुध उत्पादकांचा त्रिसदस्यीय समिती व कार्यकारी एमडीना ईशारा
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या संलग्न 45 सोसायटीच्या अध्यक्षांनी गोवा डेअरीच्या लांबवणीवरील अनिर्णीत राहिलेल्य़ा आमसभेवर तोडगा काढण्यासाठी खास आमसभा बोलावण्यात यावी अशी मागणीवजा निवेदन त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर व सहकार निबंधकाना वारंवार सादर केल्यानंतरही प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी केवळ यांच्यात समन्वयक नसल्याने सदर विषयावर कोणताच तोडगा निघत नसल्याचे चित्र दिसत आहे.
आमसभेबाबत प्रत्येकवेळी कोरोना महामारीचे कारण सांगत आमसभा पुढे ढकलण्याचे प्रकास सद्या सुरू आहेत. डेअरी संलग्न 176 सोसायटी सभासद त्यानंतर डेअरीचे सर्व खाते प्रमुख, लिपीक, सहाय्यक कर्मचारी, त्रिसदस्यीय समितीचे अधिकारी मिळून हा आकडा 210 पर्यंत पोचत असल्याचे कारण सांगत डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर देत आहेत. तरीही डेअरीत पारदर्शकता व सुरळीत व्यवहारासाठी काही दुध उत्पादकांनी आमसभा तात्काळ घेण्याचा आग्रह धरलेला आहे.
प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी अनिल फडते यांच्यामध्ये समन्वयक नसल्याने डेअरी नुकसानीच्या खाईत जात असल्याचा संशय काही दुध उत्पादकांनी व्यक्त केलेला आहे. तसेच याप्रकरणी डेअरीवर नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने नफा-तोटयाचा हिशोब आमसभेतून जाहीर करावा असे आव्हान दिलेले आहे. प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी अनिल फडते यांचे पुर्णपणे डेअरीचा व्यवहाराकडे दुर्लक्ष होत आहे. पर्यटन हंगाम सुरू झाला असून सुद्धा पाहिजे तशी दुधाच्या विक्रीत वाढ झालेली नाही. प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी अनिल फडते यांना हटवून नवीन प्रशासक नेमावे किंवा दुध डेअरीची निवडणूक घेवून शेतकऱयाकडे दुध संघाचा ताबा द्यावा अशी मागणी दुध उत्पादकांनी केली आहे.