सहकारखात्याचीनिवृत्तएमडीसह 12 संचालकांनानोटीसजारी
प्रतिनिधी / फोंडा
कुर्टी फोंडा येथील गोवा राज्य दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीत विनाकारण कर्मचाऱयाची खोगिरभरतीप्रकरणी जबाबदार धरून एका निवृत्त व्यवस्थापकीय संचालकासह बारा माजी संचालकाविरोधात सहकार खात्याने 1 कोटी 35 लाख 32 हजार 120 रूपये वसुल करून घ्यावे अशी नोटीस जारी केली आहे. पंधरा दिवसात याप्रकरणी उत्तर सादर करावे असे नमूद करण्यात आले आहे. सदर कारवाईच्या नोटीसीमुळे सहकार खात्याने मागील वसुली संदर्भात महत्वाचे पाऊल उचलेलेले दिसून येते. सदर कार्यकाळात राज्यात सहकार मंत्री म्हणून महादेव नाईक कार्यरत होते.
सहकार खात्याने 13 जणांना पाठविण्यात आलेल्या नोटीसीनुसार 1 कोटी 35 लाख 32 हजार 120 रूपयांची वसुली तेरा जणाकडून करण्यात यावी असा आदेश जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये माजी व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांच्यासह 12 माजी संचालकांचा समावेश आहे. माजी संचालक श्रीकांत पांडुरंग नाईक (अध्यक्ष-प्रगती दुध सोसायटी कपिलेश्वरी), धनंजय नंदबा देसाई (कामधेनू दुध उत्पादक संस्था अडवई सत्तरी), माधवराव शिवाजीराव देसाई (नवजीवन सहकारी दुध संस्था बोळकर्णे साकोर्डा), विठोबा दत्ता देसाई (शांतादुर्गा सहकारी दुध संस्था कुंकळी सासष्टी), बाबुराव श्रीकांत फट्टो देसाई (काकोडा सहकारी दुध संस्था, काकोडा), विजयकांत विठोबा गावकर (महामाया दुध सहकारी संस्था नेत्रावळी), मयत नरेश धर्मान मळीक नंदीनी सहकारी दुध संस्था कासारपाल लाडफे (मृत असल्यामुळे त्यांचे वारसदार पत्नी नमिता, पुत्र नितीश व उत्तम), गुरूदास केशव परब (मेणकुरे सहकारी दुध संस्था, मेणकुरे), शिवानंद बाबुसो पेडणेकर (रूद्रेश्वर सहकारी दुध संस्था हरवळे सांखळी), माधव आत्माराम सहकारी (कपिला सहकारी दुध संस्था, कुर्टी-फोंडा), राजेद्र यशवंत सावळ (पत्रादेवी सहकारी दुध संस्था, पत्रादेवी), उल्हास पांडुरंग सिनारी (जनता उत्कर्ष सहकारी दुध संस्था आमोणा) यांना पंधरा दिवसाच्या अवधीत रू 1 कोटी 35 लाख 32 हजार 120 रूपये जमा करावी अशी नोटीस जारी करण्यात आलेली आहेत. याप्रकरणी माजी संचालक व निवृत्त व्यवस्थापकीय संचालक कोणती भूमिका घेतात यावर सर्व दुध उत्पादकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. याप्रकरणी गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांच्यांशी प्रतिक्रीया जाणून घेतल्या असता सन 2015 साली दुध उत्पादकांनी गोवा डेअरीत प्रचंड प्रमाणात भष्टाचार झाल्याची तक्रार नेंदविण्यात आली होती. प्रामुख्याने विनाकारण गरज नसताना 33 कर्मचाऱयांची खोगिर भर्ती करण्यात आली होती. यामध्ये गोवा डेअरी प्रकल्पात 3 सुपरवायझर, 12 सहाय्यक सुपरवायझर व 17 कारकूनांची भर्ती करण्यात आली होती. याप्रकरणी सहकार निबंधकाशी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याकाळी गोवा डेअरीवर अस्तित्वात असलेले संचालक मंडळ व व्यवस्यापकीय संचालक यांची चौकशीअंती सर्व 13 जणांना जबाबदार धरून सहकार खात्याच्या वसुली व अंमलबजावणी विभागातर्फे नोटीस जारी करण्यात आली आहे.