दत्तप्रसाद सावर्डेकर यांचा आरोप
प्रतिनिधी / फोंडा
गोवा डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर हे सभासदांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप दूध उत्पादक दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी केला आहे. डेअरीच्या ऑडिटसंबंधी ते चुकीची माहिती देत असून मागील वर्षीचे ऑडिट पूर्ण झाल्याशिवाय या वर्षीचे ऑडिट कसे होऊ शकते असा प्रश्न सावर्डेकर यांनी उपस्थित केला आहे. दत्तप्रसाद सावर्डेकर हे गोवा डेअरीच्या आमसभेने यापूर्वी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत.
गोवा डेअरीच्या आमसभेत फेर ऑडिटचा आदेश देण्यात आला होता. शिवाय कोटय़वधी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थेचे ऑडिट पंधरा दिवसांत पूर्ण होऊ शकत नाही. ऑडिचरची नेमणुकही बेकायदेशीर केल्याचे सावर्डेकर यांचे म्हणणे आहे. व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते यांनी 18 मार्च 2020 मध्ये ऑडिटरची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार न करता आपल्याला हवा असलेला ऑडिटर बेकायदेशीर नेमला. नेमणूक पत्र देताना आमसभेच्या ठरावानुसार नेमणूक झाल्याची चुकीची माहीती दिली. आपली ही चूक त्यांनी जाहीरपणे आमसभेत मान्य केलेली आहे. तरीही अध्यक्ष शिरोडकर या मुद्दय़ावर दिशाभूल करणारी माहिती देतात.
सहकार निबंधकांनी 26 ऑक्टोबर 2016 मध्ये जारी केलेल्या परिपत्रातून ऑडिटरच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली दिलेली आहे. या नियमावलीला फाटा देऊन ऑडिटर बेकायदशीर नेमल्याचे कळताना काही दूध संस्थाच्या अध्यक्षांनी सहकार निबंधकांकडे तक्रार केली होती. परंतु अद्याप दूध संघाकडून त्याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
मार्केटिंग विभागाचे प्रमुख असलेले सुशांत गावकर यांच्याकडे त्यांची कार्यक्षमत पाहून मार्केटिंग विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ग्राहकांकडून दुधाच्या दर्जासंदर्भात आलेल्या लेखी तक्रारी त्यांनी अध्यक्ष शिरोडकर व व्यवस्थापकीय संचालक डॉ. फडते यांच्याकडे पाठविल्याने कारणाशिवाय त्यांच्याकडील ताबा काढून घेण्यात आला. नंतर काही दिवसांनी गावकर यांना बेकारदेशीररित्या निलंबित करण्यात आले. शिवाय खासगी वाहन निविदा प्रकरणातही त्यांची कुठलीही चूक नसताना त्यांना जाबाबदार धरण्यात आले. खरेदी विभागचे प्रमुख संतोष प्रभूदेसाई यांच्याकडील ताबाही कुठल्याच कारणाशिवाय काढून घेण्यात आला असून व्यवस्थापकीय संचालक डॉ. फडते यांनी स्वतः हे पद आपल्या ताब्यात ठेवले आहे.
या उलट व्यवस्थापकीय संचालक फडते यांनी शेतकऱयांकडून पैशुवैद्यकीय सेवेच्या नावाने गोळा केलेले लाखो रुपये भरणा केलेले नसतानाही त्यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. संचालक मंडळाच्या सभेत या प्रकरणी कारवाई करण्याचे ठरले होते. डॉ. फडते यांच्यावर अन्य काही गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असतानाही त्यांना जाब विचारला जात नाही. दूध विक्रीत झालेली घट, पशुखाद्य विक्रीतील घट या सर्व गोष्टींचे अध्यक्ष शिरोडकर यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल असे दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी म्हटले आहे.