प्रतिनिधी / फोंडा
गोवा राज्य दुग्ध सहकारी संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या आर्थिक विभागाच्या निलंबित व्यवस्थापिका राधिका काळे यांच्याविरुद्ध गोवा डेअरीने आरोपपत्र दाखल केले आहे. डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी 30 एप्रिल रोजी हे आरोपपत्र दाखल केले असून काळे यांना आपल्या बचावासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आरोपपत्र दाखल केल्यापासून दहा दिवसांमध्ये त्यांना आपले लेखी स्पष्टीकरण डेअरीला सादर करावे लागेल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक विभागाच्या व्यवस्थापिका राधिका काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत अनेक गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गोवा डेअरीमध्ये मागील काही वर्षांमध्ये जे काही कथित आर्थिक गैरव्यावहार झाले, त्यांचा या आरोपपत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पशुखाद्यासाठी लागणाऱया कॉटन सिडच्या खरेदी विक्री व्यवहारात झालेला तोटा, गोवा डेअरीला विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या निधी हाताळण्यास आलेले अपयश, तसेच राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळतर्फे (एनडीडीबी) मिळालेल्या निधीचा गैरवापर, पीएमसी बँकेची विश्वासार्हता न तपासताच त्यात गुंतविलेले गोवा डेअरीचे रु. 7 कोटी व सध्या ही बँक बुडीत खात्यात गेल्याने अडकलेले पैसे यासंबंधी राधिका काळे यांच्याविरुद्ध ठपका ठेवण्यात आला आहे.
व्यवस्थापकीय संचालक म्हणून तात्पुरता ताबा असताना संचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त नोंदविण्यास केलेली हयगय, माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. सी. सावंत यांच्या वेतनातील प्राप्ती कराकडे झालेले दुर्लक्ष, आपल्या पदाचा गैरवापर करीत मोठय़ा रक्कमेच्या कर्जास पात्र नसतानाही स्वत:साठी रु. 30 लाखांचे कर्ज मंजूर करुन घेणे, शिवाय व्यवस्थापकीय संचालकांची मंजुरी नसतानाही आणखी काही रक्कमेचा लाभ उठविणे असे विविध आरोप राधिका काळे यांच्यावर ठेवण्यात आले आहे.
राधिका काळे या सध्या निलंबित असून त्यांच्याविरुद्ध खात्यातंर्गत चौकशी सुरु आहे. या आरोपपत्रावर लेखी स्पष्टीकरण देण्यास त्यांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Previous Articleकायदा आंधळा, नीती पांगळी व समाज बहिरा असतो.
Next Article आठ हजार मच्छीमार गोव्यातून परत जाण्याच्या तयारीत