आमसभा पुढे का ढकलली? : खरे कारण लपविण्यासाठी पायाधरणीचे प्रयत्न : प्रशासक, त्रिसदस्यीय समितीनंतरही परिस्थिती आटोक्यात येईना
प्रतिनिधी / फेंडा
कुर्टी फोंडा येथील गोवा दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे. प्रशासक व त्यानंतर त्रिसदस्यीय समितीच्या नेमणूकीनंतरही डेअरीला आर्थिक वर्षात सुमारे रू 7.91 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या मुद्दावर दुध उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून खडांजगी होऊ नये म्हणून येत्या रविवारी 27 डिसें. रोजी बोलाविण्यात आलेली आमसभा कोणतेही ठोस कारण नसताना पुढे ढकलण्यात आल्याचा संशय काही दुध उत्पादकांनी व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार यामागील मुख्य कारण म्हणजे मागील आमसभेत मान्यता मिळालेल्या तिघा ऑडीटरपैकी एकाकडूनही डेअरीचे ऑडीट करून न घेता त्याऐवजी आपल्या मर्जीतील अन्य एका ऑडीटरकडून सदर कारभार करून घेण्यात आलेला प्रकार सद्या डेअरीच्या अंगलट आलेला आहे. त्याची सारवासारव करण्यासाठी त्या तिघां ऑडीटरांकडून मागील तारखेनुसार स्वेच्छा नकारनामा घेण्यासाठी पायाधरणीचे प्रयत्न सुरू आहे. त्यावर पांघरूण घालण्यासाठी अहवालाच्या प्रती कमी छापण्यात आल्याचे तांत्रिक कारण देऊन समितीकडून हात झटकण्याचे प्रकार होत आहे. व्यवस्थापकीय संचालकाची मनमानी कारभार, डेअरीतील दुग्धवाहकांची अरेरावी, आर्थिक वर्षात तोटा, दुध उत्पादकांची आमसभेतील प्रश्नाचा भडीमार हे सर्व चित्र पाहून भयभीत झाल्यानेच समितीने तात्पुरती पळवाढ शोधली असल्याचा आरोप दुध उत्पादकांनी केला आहे.
डेअरीवर प्रशासकाची नेमणूकीनंतर त्रिसदस्यीय समिती मिळून वर्ष उलटले तरी परिस्थिती सुधारेना, सहाय्यक निबंधक राजेश परवार यांनी माजी संचालकाविरोधात चौकशीचा अहवाल सादर केलेला असूनही आजपर्यत नुकसानीची वसुली संचालकाकडून करण्यासंबंधी नोटीसी जारी करण्यात का विलंब? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून डेअरीच्या सुरळीत कारभारासाठी सरकारने फेरविचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
व्यवस्थापकीय संचालक त्रिसदस्यीय समितीच्या वरचढ
व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करीत असल्याचा टपका काही दुध उत्पादकांनी ठेवला असून डेअरीच्या वाहनाचा दुरूपयोग, डेअरीच्या खर्चातून महागडे मोबाईल, आपल्या सहकाऱयांना देण्यात येणारी हीन वागणूक याप्रकरणी एका कर्मचाऱयांने सहकार निबंधकाकडे तक्रार नोदविल्याचाही संशय एका दुध उत्पादकाने केला आहे. तसेच त्यानी वेटरनरी सर्व्हीसच्या रूपात सभासदाकडून एकत्रित केलेली रक्कम आजपर्यंत डेअरीला सुपुर्द केलेली नाही. व्यवस्थापकाच्या ‘सेफ कस्टडीत’ ठेवण्यात येत असलेली संचालक मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तसारखी महत्वाची कागदपत्रे कुठे गायब झाली ? असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. डेअरीला मारक ठरत असलेल्या व्यवस्थापकीय संचालकाला हटवून त्याजागी दुसरा सक्षम अधिकाऱयाची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तांत्रिक अडचणीमुळे आमसभा पुढे ढकलली-दुर्गेश शिरोडकर
यासंबंधी डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांच्यांशी संपर्क साधला असता काही तांत्रिक अडचणीमुळे आमसभा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोवा राज्य सहकारी बॅकची आमसभा त्याचदिवशी होत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. डेअरीची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा दावा त्यांनी केला असून आपल्या कार्यकाळात सुमारे रू. 2 कोटी 40 लाख नफा झाल्याचे सांगताना तसेच पुढे ढकलण्यात आलेली आमसभा 17 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी दिलेल्या नफ्याविषयी आकडेवारी आमसभेत कसे सामोरे जातात यावर सर्व दुध उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
माहिती उपलब्ध नसल्याचा शेरा मारण्याचा प्रकार – राजेश फळदेसाई
माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी माहिती हक्क कायद्याखाली डेअरीची आर्थिक बाजू, दुध संकलन, विक्री, डेअरीने दुध पावडराविषयी माहिती जाणून घेण्यात प्रयत्न केला असता त्यावर सदर माहिती उपलब्ध नसल्याचा शेरा मारण्यात आलेला आहे. जेव्हा सहकार खात्यातील जबाबदार अधिकारी त्रिसदस्यीय समितीत समावेश असूनही माहिती उपलब्ध होत नसल्यामागील कारण न कळण्यासारखे असल्याची पतिक्रीया दिली असून डेअरी कोणाच्या हातात सुरक्षित आहे यावर प्रत्येक दुध उत्पादकांनी सखोल विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गोवा दुध उत्पादक संघाची 17 जानेवारी 2021 रोजी होणाऱया आमसभेत खडाजंगी होण्याची शक्यता असून दुध उत्पादकांच्या सादर केलेल्या प्रश्नांना त्रिसदस्यीय समिती कशाप्रकारे तोंड देतात यावरून डेअरीची पुढील वाटचाल ठरणार आहे.