कोरोनामुळे त्रिसदस्यीय समिती खास आमसभा घेणार की नाही?
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरी सद्यपरिस्थितीत कार्यभार हाताळणारी त्रिसदस्यीय समितीला खास आमसभेसंबंधी सहकार निबंधकाने नोटीस जारी केली आहे. दुध उत्पादकांच्या निवेदनानुसार खास आमसभा तात्काळ बोलाविण्यासंबंधी तात्काळ निर्णय सहकार निबंधकांना कळविण्यात यावा असे या नोटीसीत म्हटले आहे.
गोवा डेअरी संलग्न 45 सोसायटय़ाच्या अध्यक्षांनी 25 जून 2021 रोजी त्रिसदस्यीय समितीकडे खास आमसभा घेण्याची यावी असे निवेदन सादर केले होते. लांबवणीवरील अनिर्णीत राहिलेल्य़ा आमसभेवर तोडगा काढण्यासाठी खास आमसभा बोलावण्यात यावी अशी मागणीवजा निवेदन त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर व सहकार निबंधकाना सादर केले होते. महिना उलटण्यापुर्वी कार्यवाही होणे गरजेचे होते परंतू कोणत्याच हालचाली झाली नसल्याचे दिसून येते.
सहकार सोसायटी कायद्यानुसार कलम अ(58) उपविभाग 1 (ii) नुसार ही खास आमसभा बोलाविण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी होणाऱया खास आमसभेत चर्चेच्या विषयात 12 फेब्रु. 2021 रोजी घेतलेल्या आमसभेचा अहवाल सादर करणे, पशुखाद्याचे मार्केटींग, डेअरीतील कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांना सेवेत कायम करण्यासंबंधी, कन्सलंन्टची नेमणूक तसेच 25 जून 2021 पर्यंत त्रिसदस्यीय समितीने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयावर चर्चा करण्यासंबंधी खास आमसभा बोलाविण्यात यावी अशी मागणी 45 सोसायटीच्या अध्यक्षांनी सादर केलेल्या मागणीवजा निवेदन सहकार निबंधक व डेअरीचे अध्यक्षांना सादर करण्यात आले आहे.
त्रिसदस्यीय समितीच्या भूमिकेवर सर्व दुध उत्पादकांचे लक्ष
कोरोनाच्या परिस्थिती खास आमसभा होणार की नाही? याबाबत साशंकता दुध उत्पादकांना आहे. आमसभेत डेअरी संलग्न 176 सोसायटी सभासद त्यानंतर डेअरीचे सर्व खाते प्रमुख, लिपीक, सहाय्यककर्मचारी, त्रिसदस्यीय समितीचे अधिकारी मिळून हा आकडा 210 पर्यंत पोचण्याची शक्यता असल्याने यावर कोणते उत्तर त्रिसदस्यीय समिती सहकार निबंधकाने देते यावर सर्व दुध उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच कोटन सिड घोटाळय़ासंबंधी गहाळ झालेल्या फाईल व नंतर कंत्राटदारांना फेडण्यात आलेली चार बिले याविषयावरही या खास आमसभेत गदारोळ माजण्याची शक्यतेबाबत काही दुध उत्पादक जोरदार चर्चा करीत आहेत.