प्रतिनिधी/फोंडा
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी गोवा डेअरीच्या सुमारे 200 कामगारांनी सोमवारी कामावर बहिष्कार टाकून लाक्षणिक संप पुकारला. प्रशासकांशी झालेल्या चर्चेनंतर हा संप तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला, तरी त्याचा परिणाम म्हणून सोमवारी दुपारी बाजारातील दूध पुरवठा खंडीत झाला. पुरवठा न झाल्याने गोवा डेअरीची बरीचशी दूध पुरवठा केंद्रे बंद राहिल्याने सायंकाळी दूध खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.
गोवा डेअरीच्या प्रशसानाला दिलेल्या लेखी सुचनेनुसार सोमवारी सकाळपासूनच कामगारांनी कुर्टी येथील डेअरी संकुलाच्या गेटसमोर थांबून संपाला सुवात केली. कामगार नेते पुती गावकर यांच्या नेतृत्त्वाखाली हा तीन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. सकाळी 11 वा. सुमारास डेअरीचे प्रशासक अरविंद खुटकर यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. कामगारांच्या मागण्यासंबंधी राज्य सहकार निबंधकाशी बुधवारी दुपारी संयुक्त बैठक घेऊन मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगार संघटनेचे सरचिटणिस हेमंत सावंत यांनी हा संप तात्पुरता स्थगित ठेवण्याचे जाहीर केले. त्यानंतर कामगार आपापल्या विभागात कामावर रुजू झाले.
पहिल्या पाळीतील उत्पादनाला झाला उशिर
डेअरीच्या दूध प्रक्रिया व उत्पादन विभागाची पहिली पाळी सकाळी 7 वा. सुरु होते. या पाळीवरील कंत्राटी कामगार सोडल्यास इतर कामगारही संपात सहभागी झाल्याने पहिल्या पाळीच्या उत्पादनाला उशिर झाला. त्याचा परिणाम म्हणून दुपारी बाजारात होणारा दूध पुरवठा खंडित झाला. गोवा डेअरीतील प्रशासकीय, मार्केटिंग तसेच उत्पादन विभाग, पशुखाद्य कारखाना व इतर विविध विभागामध्ये काम करणारे साधारण 200 कामगार या संपात सहभागी झाले होते.
बुधवारच्या बैठकीपर्यंत संप स्थगित
कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बुधवारी पणजी येथे सहकार निबंधकांसोबत होणाऱया बैठकीत मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढील कृती ठरविण्यात येईल. तोपर्यंत संपाची कृती स्थगित राहणार असल्याचे हेमंत सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
गोवा डेअरीच्या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करावी या मागणीसाठी गेल्या ऑक्टोबरपासून कामगारांचा व्यवस्थापनाशी पाठपुरावा सुरु आहे. या मागणीवर जोर देण्यासाठी 6 ते 8 जानेवारी असे तीन दिवस लाक्षणिक संप पुरकारण्याचा निर्णय घेतला होता. तशी आगाऊ लेखी सूचनाही व्यवस्थापनाला दिली होती, असे पुती गावकर यांनी सांगितले. गोवा डेअरीच्या कामगारांना नियमानुसार सातवा वेतन आयोगाच्या श्रेणिनुसार पगार मिळला पाहिजे. गोवा डेअरी तोटय़ात जाण्यासाठी तेथील ढिसाळ प्रशासकीय कारभार व राजकीय हस्तक्षेप कारणीभूत असल्याचा आरोप पुती गावकर यांनी केला.
पगारवाढीशी आमसभेचा संबंध येत नाही
प्रशासक अरविंद खुटकर यांनी संपवार गेलेल्या कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर येत्या बुधवारी दुपारी 3.30 वा. सहकार निबंधकांशी संयुक्त बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. गोवा डेअरी ही स्वायत्त संस्था आहे. कामगारांना सातवा वेतन आयोगानुसार पगारवाढ देण्यासाठी डेअरीला हा आर्थिक भार पेलणार काय? सध्या गोवा डेअरीवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे पगारवाढीच्या मुद्दय़ावर व मागील दहा वर्षांच्या आर्थिक तफावतीसंबंधी गोवा डेअरीच्या आमसभेची परवानगी आवश्यक आहे या सहकार निबंधकांनी केलेल्या लेखी पत्रातील मुद्दय़ांवर प्रशासक खुटकर यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र कामगारांनी पगारवाढीसाठी आमसभेची संमती या मुद्दय़ावर हरकत घेतली. कामगारांची नियुक्ती, पगारवाढ, भत्ते व अन्य काही विषय हे संचालक मंडळाच्या अखत्यारीत येतात. आमसभेशी त्याचा संबंध येत नाही. यापूर्वी डेअरी कामगारांना पाचवा व सहावा वेतन आयोगानुसार पगार मिळाला आहे. सातवा वेतन आयोग लागू करताना आमसभेची परवानगी का भासणार असा कामगारांचा प्रश्न आहे. सन 1990 पासून कामावर असलेल्या बऱयाच कामगारांना गेली 7 ते 8 वर्षे थकबाकी मिळालेली नाही असे हेमंत सावंत यांनी सांगितले.
तर पशुखाद्याचेही दर वाढवा
गोवा डेअरी सध्या तोटय़ात चालते. शेतकऱयांना म्हशीच्या व गायीच्या दुधावर दरवाढ दिल्याने सप्टेंबरपासून 63 लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढलेला आहे. ही तफावत भरुन काढण्यासाठी यापुढे पशुखाद्यावरील दर वाढवावे लागणार आहेत. सरकारकडून त्यासाठी परवानगीही मिळाल्याचे हेमंत सावंत यांनी सांगितले. सध्या बाजारातील दुधात केलेल्या दरवाढीमुळे कामगारांचा पगार वाढेल असा कामगारांचा अजिबात समज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दूध उत्पादक व डेअरीचे माजी अध्यक्ष अनुप देसाई यांच्या वक्तव्याला हरकत घेताना देसाई हे नेहमीच कामगारविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोपही हेमंत सावंत यांनी केला. शेतकऱयांच्या हिताचा विचार करताना कामगारांचाही विचार केला जावा असेही ते म्हणाले.
सोमवारी दुपारचा दूध पुरवठा खंडित
दरम्यान सोमवारी सकाळपासूनच इतर कामगारांबरोबरच प्रक्रिया व उत्पादन प्लांटवरील कामगार संपावर गेल्याने सकाळी संकलीत केलेले दूध फ्रिजमध्ये ठेवावे लागले. प्रक्रिया व उत्पादनाला उशिर झाल्याने दुपारी बाजारात होणारा पुरवठा खंडीत झाला. परिणामी फोंडा परिसरातील बहुतेक दूध विक्री केंद्रे बंद राहिल्याने ग्राहकांचीही गैरसोय झाली. संकलीत केलेल्या दुधावर दुपारच्या दुसऱया पाळीत प्रक्रीया व उत्पादन सुरु होईपर्यंत दुपारच्या पुरवठय़ाची वेळ टळली होती.