आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट : तब्बल 14 कोटींची नुकसानी,दुध विक्री केवळ 40 हजार लिटर,आमसेभला केवळ 68 सदस्य हजर
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ (गोवा डेअरी)ची आर्थिक स्थिती अंत्यत बिकट असून एकंदरीत रू 14 कोटी नुकसानी सोसावी लागत आहे. सद्यपरिस्थितीत राज्यातील गोवा डेअरी संलग्न दुध उत्पादकांना जगविण्यासाठी सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी केले आहे. काल रविवारी कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनात गोवा डेअरीची खास सर्वसाधारण सभा झाली.त्यात डेअरीची खालवलेली परिस्थिती पुन्हा प्रकाशझोतात आली.
गोवा डेअरीच्या संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. गोवा डेअरीच्या चालू आर्थिक वर्ष 2022चे ऑडिट करण्यासाठी चार ऑडिटरांची नेमणूक करण्याचा ठराव या खास सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला. त्यानुसार श्रीधर भट, गीताली तळावलीकर, शेखर मराठे, वामन शिरोडकर याची निवड करण्यात आली आहे.
सगळय़ाच बाबतीत डेअरीची घसरण
गोवा डेअरीवर प्रशासकाच्या नेमणुकीच्या काळात सर्वाधिक नुकसानी सहन करावी लागलेली आहे. तसेच कथित रू. 5 कोटीच्या घोटाळाप्रकरणी न्यायालयीन चौकशी, कंत्राटदाराकडून देय असलेली बाकी, दुध संकलनात झालेली घट, बाजारात गोवा डेअरीची 70 हजार लिटरवरून आजच्या घडीला 40 हजार झालेली घरसण, पशुखाद्य प्रकलात 100 टन पशुखाद्यावरून 50 टनावर येऊन पोचलेल्या आकडयामुळे आर्थिक स्थिती मोडकळीस आलेली आहे.
सुमुल शेतकऱयांचे हित जपणाऱयांपैकी नाही
सरकारने वेळीच आर्थिक सहकार्य करून गोवा डेअरीला संजीवनी द्यावी. गोवा डेअरीला आज सुमुलकडून वाढती स्पर्धा होत आहे. गोवा डेअरी रसातळाला पोचल्यानंतर सुमूल राज्यातील शेतकऱयाचे हित जपणाऱयापैकी नसून गोवा डेअरीच्या संलग्न दुध उत्पादकांना टिकवून ठेवण्यासाठी सरकारने आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी केली आहे.
डेअरीची नुकसानी रू. 14 कोटीच्या घरात
गोवा डेअरीची नुकसानी रू. 14 कोटीच्या घरात पोचली आहे हे सत्य मानले तर प्रशासकाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या कार्यकाळात दुध उत्पादकांना दीड कोटी रूपये दरफरक कसा काय वाटण्यात आला? सन 2019-20 सालच्या ऑडिटला अजून आमसभेत मंजूरी मिळालेली नाही. पुनः प्रक्रियेनंतर झालेल्या ऑडिटच्या अहवालानंतर नुकसानी आकडा किती फुगलेला आहे हे स्पष्ट होणार आहे. मागील दीड वर्षात आमसभेला ग्रहण लागले होते, आमसभा रद्द, तहकूब अशी परिस्थिती झाली होती. 2019 सालचे ऑडिट झाल्यानंतर आमसभा घ्यावी असा पवित्रा दुध उत्पादक घेत होते. नवनिर्वाचित संचालक मंडळाखाली सर्व आमसभा सुरळीत झाली. तसेच यंदाच्या वर्षासाठी ऑडिटरची नवीन टीमही जाहीर केली आहे, त्यामुळे काही दुध उत्पादकांना आश्चर्याचा धक्काही यावेळी बसला.
या खास सर्वसाधारण सभेला 178 सोसायटय़ांपैकी केवळ 68 सोसायटय़ांचे सभासद उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश फळदेसाई म्हणाले की गोवा डेअरीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या दिवसाकाठी होणारी दुधाची 40 हजार लिटर विक्री सप्टेंबरपर्यंत 70 हजारपर्यत पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चतुर्थी व सणासुदीच्या दिवसात गोवा डेअरीचा दुधपुरवठा कमी होऊ नये यासाठी दिवसाकाठी बाहेरील राज्यातून 10 हजार लिटर दुध मागविण्यात येत आहे. हायफॅट दुध ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे फळदेसाई म्हणाले.