नीलेश काब्राल यांचे आव्हान सत्येंद्र जैन यांनी स्वीकारले
प्रतिनिधी /पणजी
वीज विषयावर गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिलेल्या खुल्या चर्चेचे आव्हान दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्वीकारले असून ते येत्या सोमवारी 26 जुलै रोजी दुपारी त्यासाठी गोव्यात येणार आहेत. जैन यांनी व्ट्टि करुन हे जाहीर केले आहे.
वीज मोफत देण्याच्या विषयावरुन ‘आप’ने गोव्यात मोठी घोषणाबाजी चालवली असून त्याला गोव्याचे वीजमंत्री काब्राल यांनी आक्षेप घेऊन खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. ते आव्हान स्वीकारण्यात आल्याने आता दोन्ही वीजमंत्री सोमवारी 26 जुलै रोजी आमने – सामने येणार आहेत. त्यामुळे हा सामना आता रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
सोमवारी दुपारी 3 वा. दोन्ही मंत्री वीजप्रश्नी समोरासमोर चर्चा करणार असून या वाद-विवादात कोण बाजी मारतो ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. गोव्यातील ‘भाजप’ सरकारसाठी तसेच दिल्लीतील ‘आप’ सरकारसाठी सदर चर्चा म्हणजे मोठी कसोटी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.