प्रतिनिधी /पणजी
गोव्यात सत्ता मिळाली तर 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आम आदमी पक्षाच्या आश्वासनानंतर दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन आणि गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल हे आज सोमवार दि. 26 जुलै रोजी दुपारी 3 वा. आमने-सामने उभे ठाकणार आहेत. या वाद-विवाद तसेच खुल्या चर्चेत ‘आप’ व ‘भाजप’ या दोन्ही पक्षांची तसेच वीजमंत्र्यांची कसोटी लागणार असून काही चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार असल्याने हा रगंतदार सामना थेट पहायला मिळणार आहे.
पणजीतील मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये हा सामना रंगणार असून त्यात कोण विजयी आणि कोण पराभूत होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अलिकडेच गोव्यात येऊन गेले. तेव्हा त्यांनी गोव्यातील जनतेला 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. आपने गेल्या अनेक महिन्यांपासून या विषयी प्रचार चालवला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत.