मुख्यमंत्री सावंत, तानावडे, धोंड, बी. एल. संतोष, देवेंद्र फडणवीस देखील सहभागी
प्रतिनिधी /पणजी
नवी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आणि गोव्याच्या निवडणुकीसंदर्भात अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्याच्या आतापर्यंत निवडणुकीसंदर्भात केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
अमित शहा यांनी दोन दिवसा अगोदरच मुख्यमंत्र्यांना दिल्लीत भेटीला बोलाविले होते. गोवा दौऱयामध्ये अमित शहा यांना निवडणुकीसंदर्भातील सविस्तर आढावा घेता आला नव्हता. तसेच पक्षाचे इतर केंद्रीय पदाधिकारी तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे नवी दिल्लीमध्येच बैठक घेण्याचे ठरवून शहा यांनी त्यांना दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले होते. या बैठकीत भाजपने आगामी निवडणुकीत आपली वेगळी अशी रणनीती कशा प्रकारे ठरवावी याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे तीन तास चालली. बैठकीत भाजपचे गोव्याचे निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गोव्याचे खास निरीक्षक असलेले बी. एल. संतोष तसेच गोव्याचे प्रभारी सी. टी. रवी हे देखील बैठकीस उपस्थित होते.
बैठक फलद्रूप होईल : सदानंद तानावडे
या बैठकीनंतर रात्री उशिरा मुंबईमार्गे मुख्यमंत्री गोव्याच्या दिशेने रवाना झाले तर तानावडे आणि सतीश धोंड हे आज सकाळी नवी दिल्लीहून गोव्याला पोहोचतील. रात्री उशिरा तानावडे यांच्याशी संपर्क झाला असता तानावडे यांनी बैठकीबाबत समाधान व्यक्त केले. आगामी निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण बहुमतानिशी विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेली बैठक फलद्रूप होईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून अहवाल सादर
दरम्यान, रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत सविस्तर निवडणुकीचा आढावा, पक्षीय पातळीवर भाजपने केलेले प्रयत्न आणि सरकारी पातळीवर राबविण्यात आलेले उपक्रम यातून जनतेवर होणारा प्रभाव आणि तळागाळातील घटकांपर्यंत सरकारी योजनांना लाभ पोहोचविण्यासाठी सरकारी पातळीवर केलेले प्रयत्न याबाबतचा सविस्तर आढावा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपला अहवाल देखील सादर केला.