गोवा/प्रतिनिधी
इतिहासाचा साक्षीदार असलेल्या अगौडा किल्ल्यातील तुरूंगाबद्दल माहिती देताना गोव्याच्या पर्यटन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमणकर्ते असा केल्याने त्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान पर्यटन विभागाकडून करण्यात आलेल्या त्या ट्वीटवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी खडेबोल सुनावल्यानंतर पर्यटन विभागाने ट्वीट डिलीट करत माफी मागितली आहे.
गोव्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध अशा अगौडा किल्ल्यातील तुरूंगाविषयी पर्यटन विभागाने ट्वीट केलं होतं. या ऐतिहासिक वास्तूंची माहिती देताना ट्वीटमध्ये पर्यटन विभागाने डच आक्रमकांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील मराठा मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमक असा करण्यात आला आहे. गोव्यात भाजप सरकार असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.
काय केलं होतं ट्वीट?
“अगौडा तुरुंग अप्रतिम अगौडा किल्ल्याच्याच भाग आहे. हा किल्ला १६६२ मध्ये निर्माण करण्यात आला होता. डच आणि मराठा आक्रमकांच्या विरोधात पोर्तुगीजांचं संरक्षण करणारा हा किल्ला आहे. हा दोन भागांमध्ये विभागण्यात आलेला आहे,” असं ट्वीटमध्ये म्हणण्यात आलं होतं. पर्यटन विभागाने डच आक्रमकांबरोबर मराठा सैनिकांचाही आक्रमक असा उल्लेख केल्यानंतर टीका सुरू झाली.