मडगावातील व्यापाऱयांची मागणी
प्रतिनिधी/ मडगाव
सरकारने गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश 2020 जारी केलेला आहे. हा अध्यादेश राज्यातील पालिकेच्या मालकीच्या दुकानधारकांच्या हिताहाड असल्याने तो त्वरित रद्द करण्यात यावा. यासाठी राज्यातील प्रत्येक मंत्री व आमदारांना भेटून हा अध्यादेश रद्द करण्यात यावा यासाठी दबाव आणला जाईल अशी माहिती मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिली. दरम्यान, सरकारने काल हा अध्यादेश मागे घेतल्याने मडगावातील व्यापाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.
मडगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना श्री. शिरोडकर म्हणाले, आमची सर्व दुकाने अनेक वर्षापासून आहे. सरकारने आमच्यासाठी जुने कायदे कायम ठेवावे. ज्यांनी नवीन दुकाने बांधली आहेत किंवा बांधत आहे. त्याच दुकानदरांना नवीन कायद्याची अंमलबजावणी करावी. मडगावमधील काही दुकानदारांनी दुकाने विकलेली आहे असा आरोप होत आहे. पण ते तथ्य नसून काही दुकानदार हयात नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी ती भाडय़ाने दिलेली आहेत.
दरम्यान, म्हापसा, पणजी, मडगाव तसेच गोव्यातील इतर भागातील व्यापारी वर्गाने अध्यादेशाला तीव्र विरोध केला. तसेच गुरूवार दि. 7 रोजी दुकाने बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. काल व्यापाऱयांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पणजीत भेट घेऊन चर्चा केल्यानंतर सरकारने हा अध्यादेश मागे घेतल्याचे स्पष्ट केले. सरकारने अध्यादेश मागे घेतल्याने मडगावातील व्यापाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा प्रकारचे अध्यादेश जारी करून सरकारने विनाकारण रोष ओढवून घेऊ नये असे मत देखील व्यापाऱयांनी व्यक्त केले आहे.