प्रतिनिधी / पणजी
गोवा काजू फेनी डिस्टिलर्स आणि बॉटलर्स असोसिएशन (जीसीएफडीबीए) ने गोवा फेणी धोरण, 2021 च्या अधिसूचनेचे स्वागत केले आहे.
गुरुवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गुरुदत्त भक्त यांनी काजू फेणी उद्योगातील भागधारकांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त केले आहे. या धोरणामुळे राज्यातील संपूर्ण फेणी उद्योगात महत्वपूर्ण सुधारणा घडवून सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत अमोल गावकर, हेंजल वाझ, तुकाराम हळदणकर व मॅक वाझ यांची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचे ’फेनी धोरण’ तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे फेणीला ’हेरिटेज स्पिरीट ऑफ गोवा’ चा दर्जा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
गोवा आणि जगभरातील काजू फेणीचा दर्जा वाढविण्यासंबंधी जनजागृती आणि मानके वाढविण्यात जीसीएफडीबीए ने यश मिळविले होते. त्याकामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल भक्ता यांनी अबकारी आयुक्त शशांक त्रिपाठी यांची प्रशंसा केली. ज्यांनी भागधारक तसेच माजी अबकारी आयुक्त मेनिनो डिसूझा यांच्यासाठी रोडमॅप आराखडा बनवून ही प्रक्रिया सुरू केली होती, असे भक्ता यांनी नमूद केले.
काजू फेणीला जीआय हा बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) प्राप्त झाल्यामुळे ’गोवा हेरिटेज ड्रिंक म्हणून’ उल्लंघन करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांपासून भारत सरकार काजू फेणी आणि त्यांच्या भागधारकांचे संरक्षण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना सचिव हेंजल वाझ यांनी, फेणी उद्योगाने गोव्याच्या ग्रामीण आणि अन्य सर्व संबंधित घटकांना थेट महसूल मिळवून दिला आहे. त्यामुळे कोणतीही सरकारी मदत किंवा अनुदानाशिवाय काम करणे त्यांना शक्य झाले. काजू डिस्टिलेशनद्वारे मूल्य, कौशल्य सुधारणा आणि शेतीतील कचरा कमी करून स्वतःला स्वावलंबी ठेऊ शकतात. हा दृष्टिकोन पंतप्रधानांच्या ’आत्मनिभर भारत’ तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे, असे ते पुढे म्हणाले.
खजिनदार तुकाराम हळदणकर यांनी गोवा काजू फेणी देशातील अन्य राज्ये तसेच अन्य देशांना निर्यात करण्यासाठी सरकारने समर्थन द्यावे, अशी मागणी केली. ’गोव्याचे राज्य पेय’ म्हणून फेणीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध उपक्रम प्रायोजित करावे, त्याद्वारे आम्हाला गोवा फेनी जगासमोर नेण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.