जयेश साळगावकर, विनोद पालयेकरना काँग्रेसची ऑफर : फॉरवर्डची शाश्वती नसल्याने युतीची शक्यता नाहीच,मगोकडे जागा वाटप करुन मैत्रीपूर्ण लढती करणार
प्रतिनिधी /पणजी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्डची हवाच काढून घेण्याचे ठरविले आहे. शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर आणि साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांना काँग्रेस पक्षात ओढण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. गोवा फॉरवर्डची शक्ती कमी करून या पक्षाकडे आघाडी करण्याची शक्यताच आता कमी झाली आहे.
2017 च्या निवडणुकीनंतर गोवा फॉरवर्डने घेतलेल्या भूमिकेचा बदला घेण्यास काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. गोवा फॉरवर्डने अलिकडे काणकोण, थिवी, फोंडा, मये, इत्यादींसह एकूण 11 जागांवर आपले उमेदवार निश्चित केल्याने काँग्रेस पक्षाने त्या पक्षाकडे युती वा आघाडी करायचीच नाही, असे ठरविले आहे.
गोवा फॉरवर्डची शाश्वती नाही
काँग्रेस पक्षाचे अलिकडेच जे कोणी नेते आले त्यावेळी देखील प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाची स्थिती स्पष्ट केली आणि काँग्रेसला गोव्यात या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार. काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊ शकतो, अशी परिस्थिती असल्याचे कळविले. गोवा फॉरवर्डबरोबर आघाडी केली आणि काँग्रेसच्या मदतीने हा पक्ष निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपबरोबर जाणार नाही, याची शाश्वती देता येणार नाही, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही कळविलेले आहे.
गोवा फॉरवर्डला सोडून मगोकडे बोलणी
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे मात्र काँग्रेस बरोबर युती होणारच असे छातीठोकपणे सांगत आहेत. मात्र गोवा फॉरवर्डच्या उर्वरित दोन आमदारांबरोबर काँग्रेस पक्षाने बोलणी केलेली आहे. दोन्ही आमदारांनी काँग्रेस पक्षात परतण्याची इच्छाही प्रदर्शित केली आहे. काँग्रेसने मगो बरोबरही चर्चा केलेली आहे. मगो पक्षाबरोबर आघाडी न करता केवळ जागा वाटपमध्ये मैत्रीपूर्ण लढाई करण्याचे विचार चालविले आहेत.
साळगावकर, पालयेकर काँग्रेसच्या वाटेवर
साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांच्या बाबतीत जनतेत चांगले मत आहे. हे गृहित धरून भाजपने त्यांना निमंत्रण दिले होते. मात्र मायकल लोबो आणि रोहन खंवटे यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी असल्याने जयेश काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसने त्यांना ऑफर दिलेली आहे. त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र विधानसभेचे अखेरचे अधिवेशन झाल्यानंतर कदाचित हे दोघेही काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. काँग्रेस पक्ष गोवा फॉरवर्डकडे युती करणार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी या दोन्ही आमदारांना सांगितलेले आहे. त्यामुळे दोन्ही आमदार आपला विचार बदलून काँग्रेसच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक लढविणार नाही, आपण पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक : लुईझिन
लुईझिन फालेरो यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. परंतु आपण हे पद स्वीकारू शकत नाही, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगितले. त्याचबरोबर पक्ष जी काही जबाबदारी देईल, पक्षाचा एक शिस्तबद्ध सैनिक या नात्याने आपण ती स्वीकारेन व कर्तव्याचे पालन करीन, असे सोनिया गांधी यांना आपण कळविले होते, असे लुईझिन फालेरो म्हणाले. आपल्यावर पक्षाने उमेदवार निवडीसाठीची जबाबदारी दिलेली आहे. 40 ही मतदारसंघात पक्षाचे उमेदवार निवडीचे काम आपल्याला करायचे आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. आपण स्वतः निवडणूक लढविणार नाही. याबाबत निर्णय घेतलेला नाही. आपण चिरंजीवाला उभे करणार का? असे विचारले असता त्याने कोणता निर्णय घेतलेला आहे, याची आपल्याला कल्पना नाही, असे ते म्हणाले.