प्रतिनिधी/ म्हापसा
गोवा फॉरवर्डमध्ये सोमवारी प्रवेश केलेले थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांची गोवा फॉरवर्डच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे ट्विट गोवा फॉरवर्डचे प्रमुख अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आहे.
श्री. कांदोळकर हे गोवा फॉरवर्डमध्ये आले असले तरी त्यांना कोणताच पश्चाताप होणार नाही उलट हा पक्ष त्यांना मानाचे स्थान देणार आहे. व गोवा फॉरवर्ड पुढे नेण्यासाठी त्यांच्यावर अधिकाधिक जबाबदारी संपविण्यात येणार आहे. असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
गोवा फॉरवर्ड सत्ते पर्यंत नेण्यास कार्य करणार- कांदोळकर
दरम्यान याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कांदोळकर म्हणाले की, पक्षाने व विजय सरदेसाई यांनी आपल्यास जे मानाचे स्थान दिलेले आहे व जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या पदाचा दावेदार मीच म्हणत नाही तर आपल्या थिवी मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते व तमाम जनता आहे. गोव्यात आम्हाला मानणारे जे लोक आहेत त्यांना विजय सरदेसाई यांनी मानाचा तुरा दिलेला आहे. आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती विश्वासाने चांगल्या प्रकारे पुढे नेणार आहे. भाजपमध्ये जसे मन लावून आम्ही कार्य करीत होतो त्यापेक्षा अधिक कार्य प्रामाणिकपणे गोवा फॉरवर्ड पुढे सत्तेपर्यंत नेण्यास आपण काम करणार असे किरण कांदोळकर यांनी दै. ‘तरुण भारत’ला बोलताना सांगितले.